राजकोट : शिखर धवन, लोकेश राहुल आणि विराट कोहलीच्या दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं राजकोटच्या दुसऱ्या वन डेत सहा बाद 340 धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 341 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाचा सलामीवीर धवनचं शतक अवघ्या चार धावांनी हुकलं. रिचर्डसनच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी धवननं 90 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकारासह 96 धावांची खेळी केली. लोकेश राहुलनं 52 चेंडूत 80 तर कर्णधार विराट कोहलीनं 78 धावांचं योगदान दिलं. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणारा डेव्हिड वॉर्नर बाद झाल्याने भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. वॉर्नर नंतर गेल्या सामन्यातील शतकवीर कप्तान फिंच देखील बाद झाला आहे.  वॉर्नरने 15 तर फिंचने 33 धावा केल्या.
सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत लोकेश राहुल यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर राजकोट वन-डे सामन्यात भारतीय संघाने 340 धावांचा पल्ला गाठला आहे. पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या वन-डेत भारतीय फलंदाजांची कामगिरी सुधारलेली पहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी 341  धावांची गरज आहे.


ऑस्ट्रेलियने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. गेल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवनने दुसऱ्या सामन्यात डावाची सावध सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला 42 धावांवर बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

यानंतर शिखर धवन 96 धावांवर बाद झाला. शतकापासून 4 धावा दूर असताना रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला तीनशेपार नेले. विराटने 78 धावांची खेळी केली. लोकेश राहुलने अष्टपैलू रविंद्र जाडेजाला सोबत घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला 340 धावांचा टप्पा गाठून दिला, त्याने 80 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून झॅम्पाने तीन तर अॅंडरसनने दोन विकेट्स घेतल्या.