मुंबई : भारतातील उद्योज जगतातील सर्वांत मोठ्या नावांपैकी टाटा उद्योग समुहाचे नाव आदराने घेतले जाते. या उद्योग समुहामार्फत घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाची जगभरात निर्यात होते. याच उद्योग समुहाने (TATA Group) आता मोठा निर्णय घेतला आहे. या उद्योग समुहाने त्यांच्या तीन कंपन्यांना एकाच कंपन्यांत विलीन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोजच्या कामांत मदतीला येणाऱ्या घरगुती वस्तुंची निर्मिती करणारी एफएमसीजी कंपनी टाटा कन्झ्यूमर प्रोडक्ट लिमिटेड (टीपीसीएल) या कंपनीने एनसीएलटी तसेच अन्य नियामकीय मंजुरी मिळाल्यानंतर आपल्या तीन उपकंपन्यांचे विलीनीकरण केले आहे.
'या' कंपन्यांचे झाले विलीनीकरण
टाटा उद्योग समुहाच्या एफएमसीजी (FMCG) यूनिटने दिलेल्या माहितीनुसार, टीसीपीएलने पूर्ण मालकी असलेल्या टाटा कन्झ्यूमर सोलफुल प्रायव्हेट लिमिटेड, नॉरिशको बेव्हरेजेस लिमिटेड आणि टाटा स्मार्टफूड्ज लिमिटेड या कंपन्यांना विलीन केले आहे. कायदेशीर नियमांचे पालन करून विलीनीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. हे विलीनीकरण 1 सप्टेंबर 2024 पासून लागू असेल.
टाटाच्या शेअरकडे सर्वांचे लक्ष
कंपनीचे काम सुव्यवस्थित चालावे म्हणून विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विलीनीकरणाच्या या निर्णयानंतर आता टाटा उद्योग समुहाच्या एफएमसीजी कंपनी टाटा कंझ्यूमर या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या घडामोडी घडू शकतात. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये फार मोठा चढउतार झाला नव्हता. बीएसईच्या आकड्यांनुसार टाटाच्या या कंपनीचा शेअर शुक्रवारी 1199.20 रुपयांवर स्थिरावला होता. शुक्रवारी सत्रादरम्यान हा शेअर 1206.95 रुपयांपर्यंत वाढला होता. या कंपनीचे बाजार भांडवला 1.18 लाख कोटी रुपये आहे. या चालू वर्षात टाटा कंझ्यूमर प्रोडक्ट्स या शेअरने 12 टक्क्यांपेक्षा अधिक तर गेल्या वर्षी 44 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न्स दिले आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
खुशखबर! आयफोन 15 प्लसवर तब्बल 19 हजारांची सूट, वाचा ऑफरबद्दल A टू Z माहिती