नवी दिल्ली : एनडीए सरकारचे किंगमेकर सीएम नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) चे ज्येष्ठ नेते केसी त्यागी (KC Tyagi) यांनी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यागी यांच्या राजीनाम्यानंतर राजीव रंजन यांची जेडीयूचे नवे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस अफाक अहमद खान यांनी या बदलाची माहिती देणारे पत्र जारी केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केसी त्यागी यांनी जातीय जणगणनेपासून ते लॅटरल एन्ट्रीपर्यंत अनेक मुद्यांपर्यत रोखठोक भूमिका मांडली होती.
त्यामुळे केसी त्यागी यांच्या राजीनाम्यामागे इतरही अनेक कारणे दडलेली आहेत. ज्यात त्यांच्या विधानांमुळे पक्षांतर्गत आणि बाहेरील मतभेदांचा समावेश आहे.
केसी त्यागी यांच्या वक्तव्यांमुळे पक्षात असंतोष
जेडीयूचा प्रदीर्घ काळ प्रमुख चेहरा असलेल्या केसी त्यागी यांनी अलिकडच्या काळात पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा अत्यंत वेगळी विधाने केली आहेत. अनेक प्रसंगी त्यांनी पक्ष नेतृत्व किंवा इतर वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत न करता विधाने केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्षांतर्गत असंतोषाची स्थिती निर्माण होऊन परिस्थिती हळूहळू गंभीर होत गेली होती.
एनडीएमधील मतभेदांच्या बातम्याही कारण ठरल्या
त्यागी यांच्या वक्तव्यामुळे जेडीयूमध्येच नाही तर एनडीएमध्येही मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. विशेषत: परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावर त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये सामील होत इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवण्यासाठी संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी केली. हे पाऊल जेडीयू नेतृत्वासाठी अस्वस्थ करणारे होते आणि त्यामुळे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर वाद निर्माण झाला होता.
SC/ST आरक्षण
याशिवाय, त्यागी यांनी एससी/एसटी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पक्षाशी चर्चा न करता विधान जारी केल्याची चर्चा आहे. ज्यामुळे पक्ष नेतृत्व नाराज झाले. तसेच लॅटरल एंट्रीच्या मुद्द्यावर त्यांनी पक्षाचे अधिकृत मत म्हणून आपले वैयक्तिक मत मांडले.
नेतृत्वावर प्रश्न
त्यागी यांनी अनेकवेळा त्यांची वैयक्तिक मते पक्षाची मते म्हणून मांडली, त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. ही परिस्थिती पक्षासाठी अस्वस्थ बनली आणि शेवटी जेडीयू नेतृत्वाने त्यागी यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
राजीव रंजन यांच्याकडे जबाबदारी आली
त्यागी यांच्या राजीनाम्यानंतर राजीव रंजन यांची जेडीयूचे नवे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस अफाक अहमद खान यांनी या बदलाची माहिती देणारे पत्र जारी केले. केसी त्यागी यांच्या राजीनाम्याने जेडीयूमधील अंतर्गत मतभेद कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे, जेणेकरून पक्ष एकजुटीने पुढे जाऊ शकेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यागी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या भविष्यातील रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या