Chandrapur News चंद्रपूर : भूसंपादनाच्या एका प्रकरणात समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना ऑनलाईन सुनावणीला हजेरी लावण्याचे नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. उद्या म्हणजे बुधवारला (22 जानेवारी) ही सुनावणी होणार आहे. गोसेखुर्द प्रकल्पासाठी ब्रह्मपुरी तालुक्यातील सूरबोडी या गावातील जमीन 2011 मध्ये चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं संपादित केली होती. त्या जमिनीचा भरपाईचा अवार्ड 2013 मध्ये जारी करण्यात आला, मात्र, 2024 पर्यंत भरपाईची रक्कम दिवाणी न्यायालयात जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता व्याजासकट ही रक्कम अदा करावी लागणार आहे.
मात्र ही रक्कम इतकी वर्ष का देण्यात आली नाही? याचं उत्तर जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात द्यावं लागणार आहे. विशेष म्हणजे या विलंबासाठी 2013 ते 2024 दरम्यान पदावर असलेल्या 11 भूसंपादन अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी निर्दोष ठरवल्यानं या बाबत देखील जिल्हाधिकारी विनय गौडा यांना खुलासा करावा लागणार आहे.
पाच हजारांची लाच स्विकारताना लिपिकास रंगेहात अटक
वर्ध्याच्या सेलू येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपीकास पाच हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. जमिनीचा मोजणी अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली. लाचलुचपत विभागाने सापळा रचून लिपिकाला रंगेहात पकडले आहे. रस्त्यात गेलेल्या शेतजमीनीमधील विहिरीचा मोबदला मिळण्यासाठी मोजणी अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यासाठी सेलू येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक नरेश चंद्रकांत जाधव याने सहा हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावर शेतकऱ्याकडून लाच देण्याची तयारी नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली. तडजोड करीत शेतकऱ्याने पाच हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. सदर प्रकरणात लाचलुचपत विभागाने सापळा रचून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लिपिक नरेश चंद्रकांत जाधव याला रंगेहात अटक केली आहे.
पवन हिरणवार हत्या प्रकरणातील आरोपींना अटक
नागपूर जिल्ह्यातील चर्चित गोळीबार कांड पवन हिरणवार हत्याकांडातील मुख्य आरोपी शेखू आणि अझहर यास खापरखेडा पोलिसांनी सावनेर रस्त्यावरील लाहोरी बार समोर मध्यरात्री सापळा रचून अटक केली. या गोळीबार घटनेत आतापर्यंत सात आरोपी खापरखेडा पोलिसांनी अटक केलीय. दोन जानेवारी रोजी पवन हिरणवारची नागपूर जिल्ह्यातील बाबुळखेडा शिवारात हत्या करण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वी शेखुच्या भावाची हिरणवार टोळीनं हत्या केली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी शेखू नं दोन जानेवारी रोजी बाबुळखेडा शिवारात पवन हिरणवारला एका निर्जन रस्त्यावर घेरून गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. त्या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला चार आरोपींना अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी शेखु फरार होता. काल रात्री पोलिसांनी शेखुलाही अटक केली आहे.
हे ही वाचा