Sujat Ambedkar : राजकारणातील युवा नेत्यांच्या लाईफ स्टाईलची महाराष्ट्रात नेहमी चर्चा असते. तेवढीचं चर्चा ते लग्न कधी उरकणार यावरही होत असते. यापूर्वी शिवसेना नेते (उ.बा.ठा) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या लग्नाबाबतच्या चर्चा रंगत होत्या. सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या पत्नी अंजली आंबेडकरही उपस्थित होत्या. यावेळी सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे.
काय म्हणाले सुजात आंबेडकर?
वर्ष 2024 मध्ये सुजातसाठी 'यंदा कर्तव्य आहे' का? असा प्रश्न या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला होता. या प्रश्नाला सुजात यांनी सूचक उत्तर दिले आहे. सुजात आंबेडकर म्हणाले, " माझ्यासमोर पहिलं कर्तव्य अकोला लोकसभेचं आहे.
माझ्या प्रत्येक प्रश्नाचं न थकता आतापर्यंत आई-बाबांनी उत्तरं दिलीत. त्यामुळेच मी घडू शकलो." सुजात आंबेडकरांनी लग्नापेक्षा लोकसभा निवडणुकीला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रकाश आंबेडकरांशी विवाह झाल्यामुळे आंबेडकरी चळवळीचा भाग होता आले : अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar)
प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या मुलाखती दरम्यान, त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अंजली आबेडकर (Anjali Ambedkar) या वेळी बोलताना म्हणाल्या, आमच्या लग्नामुळे मला आंबेडकरी चळवळीचा भाग होता आले याचे समाधान आहे. शिवाय, मी त्यामुळेच आनंदी असते. 'वंचित'ला सत्ता मिळाली तर मुख्यमंत्री कोण बनेल? असा सवाल अंजली आंबेडकरांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर म्हणाल्या, "ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असेल" कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर आम्हाला सुरक्षेबाबत चिंता वाटायची. आपण सुरक्षा घ्यावी, असा प्रस्ताव आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी हा प्रस्ताव फेटाळला होता, असे अंजली आंबेडकर म्हणाल्या आहेत.
राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल असल्याने त्याला लाल बावटा म्हणायचो : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांना अकोल्यात दिलेल्या मुलाखतीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. "मी जेव्हा संसदेमध्ये पाऊल ठेवणार होतो, तेव्हा चालत गेलो होतो. तेव्हा संसदेची एक वेगळी सुरक्षा व्यवस्था होती. तिथे गेल्यानंतर सुरक्षारक्षकांनी स्वागत केले. त्यामुळे मी अवाक् झालो होतो. राज्यसभेच्या कार्पेटचा रंग लाल होता, त्यामुळे मी त्याला लाल बावटा म्हणायचो. लोकसभेचा रंग हा हिरवा असल्याने तिथे जातांना ते नैसर्गिक अधिवासात आल्यासारखं वाटलं", असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला.
काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकरांचा विवाह कसा झाला? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याला प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रकाश आंबेडकरांनी टाळले आहे. काही गोष्टी सिक्रेट राहिल्या तर चांगल्या असतात, असे उत्तर आंबेडकरांनी दिले. तर अंजली आंबेडकरांनी या प्रश्नाचे दिलखुलासपणे उत्तर दिले आहे. अंजली आंबेडकर याबाबत बोलताना म्हणाल्या, आमचा विवाह म्हणजे काही मित्रांनी जमवून दिलेला प्रेमविवाह आहे. आमची पहिली भेट भारिपच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात झाली. तेव्हाही बाळासाहेब प्रसिद्ध होते. आम्ही अनेकदा ट्रेनमध्ये प्रवास करत भेटत होतो. त्या काळात मी जळगावमध्ये नोकरी करत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Sharad Pawar Meet Bachchu Kadu : शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात झाली भेट; नेमकी काय झाली चर्चा ?