रत्नागिरी : कोरोना संकटाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे. लांजा तालुक्यातील कोर्ले गावात ही घटना घडली आहे. महेश झोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.


महेश झोरे हा अत्यंत मेहनती मुलगा होता. आई-वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला राहत होते. अभ्यास करण्यासाठी महेश कोर्ले इथल्या गावाकडच्या घरी आला होता. महेशला स्पर्धा परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी बनायचे होते. त्यासाठी तो आपल्या गावाकडच्या घरी मनलावून अभ्यास करत होता. एकटा राहणाऱ्या महेशला भेटण्यासाठी त्याचे आजोबा कोर्ले इथल्या घरी नेहमी जात होते.


गुरुवारी महेशचे आजोबा कोर्ले इथल्या घरी आले त्यावेळी महेशने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महेशच्या आजोबांना या घटनेमुळे मोठा धक्का बसला. पण महेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहली होती. यात एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने नैराश्यातून मी आत्महत्या करत असल्याचं या चिठ्ठीत त्याने नमूद केले होते. लांजा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या संदर्भात माहिती देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे.


काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत?


कोरोनामुळं स्पर्धा परीक्षांच्या तारखा सतत पुढे जात आहेत. याचाच ताण महेशच्या मनावर आला. याच नैराश्यातून महेशनं टोकाचं पाऊल उचलत थेट आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. गळफास घेण्यापूर्वी महेशनं लिहिलेल्या चिठ्ठीत महेशनं हे सारं लिहून ठेवलं आहे. या घटनेनं साऱ्या परिसरात, तालुक्यात आणि जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


आत्महत्या, कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय


या घटनेनंतर सध्या जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. जीवनात यश-अपयश येत असतं. पण, त्यानं खचून जात कामा नये. कोरोनासारख्या संकटकाळात अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला. पण, अशावेळी संयम न ढळता अनेकांनी यातून सावरत पुढे जाण्याचा यशस्वी प्रयत्न देखील केला. पण, महेशनं असं का केलं? हाच सवाल अनेकांना पडला आहे. समस्या या कायम असतात. पण, त्यावर उपाय देखील आहेत. त्यामुळे महेशनं उचललेल्या या टोकाच्या पावलानंतर आत्महत्या ही कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय आहे अशीच प्रतिक्रिया सध्या महेशच्या आत्महत्येनंतर प्रत्येक जण देताना दिसत आहे.