दुग्ध व्यवसायातून दिवसाला 10 हजार कमावणारा शेतकरी!
एबीपी माझा वेब टीम | 14 Mar 2017 03:34 PM (IST)
धुळे : धुळे शहराजवळ बिलाडी शिवारात चंद्रकांत केले या प्रगतशील शेतकऱ्याची 70 एकर शेती आहे. शेतीतून त्यांना फारसा फायदा होत नसला तरी शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी दुग्धव्यवसाय सुरु केला. या दुग्ध व्यवसायातून त्यांना वर्षाला निव्वळ 36 लाखांचा नफा होत आहे. दुग्ध व्यवसायासाठी 70 एकरपैकी दीड एकर क्षेत्रावर बंद आणि खुले असे गोठे उभारण्यात आले आहेत. गर्भवती असलेल्या गायींसाठी तसंच दूध पिणाऱ्या वासरांसाठी विशेष व्यवस्था या गोठ्यांमध्ये करण्यात आली आहे. मशीनच्या सहाय्याने या गोठ्यातील गायी-म्हशींचं दूध काढण्यात येतं. दूध काढण्यापूर्वी अर्धातास आधी गोठ्यात लावण्यात आलेल्या स्पीकरवर सनईची धून वाजवण्यात येते. या गोठ्यावर 24 तास सीसीटीव्हीची नजर असते. 70 एकर शेतीत पारंपरिक पीकं घेतली जातात. शेतीचं उत्पन्न निसर्गाच्या लहरीपणावर असल्याने शेतीतून नफा होईलच यावर अवलंबून न राहता, गेल्या पंधरा वर्षापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला दोन गायी होत्या , चारा घरचाच असल्याने चारा खरेदी करण्याचा खर्च वाचला. कालांतराने दोन गायींच्या चार गायी झाल्या. सुरुवातीच्या कालावधीत यात फारसा नफा झाला नाही. मात्र तोटाही होत नसल्याचं लक्षात आल्याने दूध व्यवसायात लक्ष केंद्रीत केलं. दोन वर्षानंतर नफा होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला दरदिवशी दोन हजारापर्यंत नफा मिळत होता. आज या गोठ्यात 250 दुभती जनावरं आहेत. यात 76 देशी गायी, 27 जर्शी गायी, 45 काठेवाडी गायी, 6 म्हशी आहेत. रोज होणारं दूध संकलन हे 750 लिटर आहे. गोठ्यावर होणारा रोजचा खर्च वजा जाता रोजचा निव्वळ नफा दहा हजार रुपये आहे. वर्षाला हा नफा 36 लाखापर्यंत होतो, असं चंद्रकांत केले यांनी सांगितलं. या गोठ्यातील जनावरांना विलायती चारा, घास गवत, ऊस, मका, ज्वारी, ढेप, मक्याची चुनी, मिनरल्स देण्यात येतात. जनावरांच्या आरोग्याच्या काळजीसाठी चंद्रकांत केले यांनी एका डॉक्टरचीही नेमणूक केली आहे. जनावरांच्या शेणापासून खत, गांडूळ खताची निर्मित करण्यात येते. तसंच 40 टन क्षमतेच्या टाकीतून निर्माण होणारा गोबर गॅस शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या घरात जातो. गोठ्यातील दुभत्या जनावरांचे दूध काढण्यापूर्वी गोठ्यात लावण्यात आलेल्या स्पीकरवर सनईची धून वाजण्यात येते. यामुळे गोठ्यात मंगलमय वातावरण निर्माण होऊन दूध काढण्यासाठी दुभत्या जनावरांची मानसिकता तयार होते, हा चंद्रकांत केले यांचा अनुभव आहे. दुष्काळी स्थिती असताना पशुपालक शेतकरी आपली जनावरं विकतात. दुष्काळात आपण जेवण करायचं बंद करतो का? असा प्रश्न उपस्थित करत या स्थितीतही पशुपालकांनी आपल्या मुलांसारखी काळजी घ्यावी, असं आवाहन चंद्रकांत केले यांनी केलं आहे.