नागपूरः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने कोविड-19 च्या कालखंडानंतर प्रथमच चालू वर्षासाठी असलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे. सुब्रतो मुखर्जी स्पोर्टस एज्युकेशन सोसायटीच्यावतीने चालू वर्षातील राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन 1 सप्टेंबर ते 17 आक्टोबर या कालावधीत करण्यात येईल. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापूर्वी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
ही आहे पात्रता
नागपूर जिल्ह्यातील 14 वर्षाखालील मुले व 17 वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडयात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होवू इच्छिणारा 14 वर्षाखालील खेळाडू 1 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा तर 17 वर्षाखालील खेळाडू 1 जानेवारी रोजी किंवा त्यांनंतर जन्मलेला असावा. यास्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या सर्व संघांनी 20 ते 28 जून या कालावधीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची तसेच संघाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर येथे 28 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्टेटबोर्ड शाळा 250 रुपये व सि. बी. एस. ई शाळा 500 रुपये प्रती संघ प्रवेश शुल्क आणि खेळाडूंची यादीसह सादर करावयाची आहे. ज्या संघाची नोंदणी वेळेत सादर केली नाही, अशा संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.
स्पर्धा कालावधीत प्रशासनाकडून कोविड- 19 बाबत सूचना आल्यास त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. सद्स्थितीत कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या