नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता असते. यावेळी नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ काळजी घ्यावी. वीजेचा कडकडाट असताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन, जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात मान्सून कालावधीला सुरुवात झाली आहे. या वर्षी 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. या काळामध्ये नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्ती उद्भवण्याची शक्यता असते. यामुळे मनुष्य, पशु आणि घरे, शेती पायाभूत सुविधा तसेच पर्यावरणाचे देखील नुकसान होते. हा नुकसानीचा आकडा कमी व्हावा, यासाठी सतर्कता हाच यावरील रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
जिल्ह्यात आपत्तीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होते. यामध्ये प्रामुख्याने वीज पडून तसेच नदी-नाल्यांच्या पुरामध्ये वाहून जाण्याचे प्रमाण अधिक असते. गेल्यावर्षी थोडेथोडके नव्हे 20 लोकांचा मृत्यू वीज पडून, तर 12 लोकांचा मृत्यू हा नदी नाल्यात वाहून गेल्याने झाला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी 3 लोकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावर्षी अधिक सतर्कता बाळगून नागरिकांनी स्वरक्षण करावे, असेही आवाहन त्यांनी केले.
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. 


शेतात मोबाईल फोन सोबत बाळगू नये


शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. अतिवृष्टी व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. अतिवृष्टीच्या वेळी नदीस पूर आला असल्यास, नदी दुथडी भरून वाहत असल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पद्धतीने पुल पार करण्याचा प्रयत्न करू नये. या कालावधीत भारतीय हवामान खाते तसेच धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांनी संबंधित विभागाकडून दिल्या जात असलेल्या सूचना, हवामानाचा अंदाज, चेतावणी, पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग, याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या शासकीय सूचनांचे पालन करण्यात यावे. आपल्यासाठी आपला जीव महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा आपल्या परीवाराकरिता तो आणखी मोलाचा आहे. त्यामुळे स्वतःची तसेच परिवाराची काळजी घेणे आवश्यक असून मान्सून कालावधीत सतर्क राहणे गरजेचे असल्याचे आवाहनही जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.