नागपूरः कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात 'ऑनलाईन स्कूल' हा शब्द प्रचलीत झाला होता. शिक्षक शाळेत आणि विद्यार्थी घरी अशा पद्धतीने शाळा सुरू होती. मात्र प्रदीर्ष काळानंतर विद्यार्थ्यांनी वर्ग खचाखच भरलेले दिसले. उन्हाळी सुट्ट्यांनंतर आज शहरातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत. आज सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी रामनगर दक्षिण भारतीय मंदिर जवळ मनपा इंग्रजी शाळेत नवीन शैक्षणिक सत्राचे उदघाटन केले. यापूर्वी 27 जूनला शाळा सुरु करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. मात्र नंतर नवीन आदेशानुसार 29 जून रोजी शाळा सुरु करण्याजे आदेश जारी करण्यात आले होते.
तसेच नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दोन वर्षांनंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षातील शाळांची पहिली घंटा आज वाजली. जिल्हा परिषद शाळांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 5.15पर्यंत अनुदानित व काही खासगी शाळांच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 1536 शाळांनी प्रवेशोत्सवाची तयारी केली होती. शाळा सुरु झाल्यानंतर शाळेची भीती दूर करण्याचे आणि अभ्यासात मागे पडलेल्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना मेहनत घ्याली लागणार आहे. काही शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके आणि गणवेश देण्यात आला.
दोन वर्षांचा कोरोना संकट आणि त्यानंतरची उन्हाळी सुट्टीनंतर संपल्यानंतर आजपासून नागपुरात सर्व अनुदानित शाळा सुरु झाल्या. कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या.त्यानंतर मागील शैक्षणिक सत्रात जेमतेम नावापुरते विद्यार्थी शाळेत आले होते. त्यामुळे दोन वर्षानंतर पहिल्यांदाच आजपासून शाळांचे नियमित शैक्षणिक सत्र सुरु झाले. अनेक महिन्यानंतर शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ, काही चिमुकल्याच्या शाळेचा पहिलाच दिवस, तर काहींना सुट्टी संपल्याची हुरहूर अशा वेगवेगळ्या भावनेतून शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा अनेक शाळांनी स्वागत केला. कुठे प्रवेशोत्सव साजरा झाला, तर कुठे चॉकलेट आणि पुष्प देऊन विद्यार्थ्यांचा स्वागत झाला.
नूतन भारत विद्यालयाचा आगळावेगळा उपक्रम
नूतन भारत विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीवर घेऊन गेले. त्यांच्याकडून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून घेत अभिनव पद्धतीने शाळेच्या शैक्षणिक सत्राची सुरुवात केली. शाळेचे शेकडो विद्यार्थी पायी चालून दीक्षाभूमीवर पोहोचले आणि बाबासाहेबाना वंदन करत बाबासाहेबांनी रचलेल्या संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन केले.
गोंदिया जिल्ह्यात आजपासून वाजली सोळाशे शाळांची घंटा
गोंदियाः कोरोनाच्या संकटानंतर या वर्षीचे शैक्षणिक सत्र प्रत्येक्षात विदर्भात आजपासून सुरू झाले असून गोंदिया जिल्ह्यातील 1663 शाळांची घंटा आज वाजली असून शाळेचा पहीला दिवस विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाने साजरा करण्यात आला. तर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेची सजावट सुद्धा करण्यात आली .शाळेच्या पहील्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या संकटानंतर पहील्यांदाच शाळा सुरू झाल्याने शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता.अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे बलून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील सव्वातीन हजार शाळां पुन्हा गजबजल्या
यवतमाळ : यंदा कोविड संसर्ग कमी झाल्याने शाळा वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज 29 जूनला शाळेची पहिली घंटा वाजली असून, कोविड नियम पाळले जाणार आहे. जिल्ह्यातील माध्यमिक, प्राथमिक आणि आश्रमशाळा अश्या तीन हजार 333 शाळा आजपासून सुरू झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी दिली. शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्यास शाळेच्या वेळेत बदल होईल. शालेय पोषण आहार शिजवला जाणार नाही. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अशा प्रकारे काळजी घेऊन शाळा सुरू राहणार आहेत.