नागपूरः भाविकांना विठुरायाचे दर्शन घडविण्यासाठी नागपूर ते पंढरपूर यात्रा स्पेशल बसची सेवा दिल्यानंतर आता एसटी महामंडळ भाविकांना प्रसिद्ध नागद्वार पचमढी यात्रेसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. 23 जुलैपासून ही विशेष बससेवा सुरू होणार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मधील भाविकांचे खास आकर्षण असलेली नागद्वार यात्रा पुढच्या आठवड्यात सुरू होत आहे.
नागद्वारमध्ये गोविंदगिरी पहाडावर मुख्य गुहेत शिवलिंग असून या शिवलिंगला काजळ लावल्यास मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नागमोडी वळणातून नागद्वारची कठीण यात्रा पूर्ण केल्यास कालसर्प दोष दूर होतो, अशीही भाविकांची श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यामुळे श्रावणात या यात्रेला भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. ते लक्षात घेऊन एसटी महामंडळाने नागद्वार यात्रेचे नियोजन केले आहे. गणेशपेठ बसस्थानकावरून 23 जुलैसायंकाळी 5.30 वाजतापासून दर अर्ध्या तासाने बस पचमढीसाठी निघणार आहे. पचमढी नागद्वार यात्रा करणाऱ्या भाविकांसाठी 385 रुपये बसचे भाडे निश्चित करण्यात आले असून, या व्यतिरिक्त अन्य किरकोळ स्वरुपाचा अतिरिक्त यात्रा कर प्रवाशांना भरावा लागणार आहे.
बसेसचे वेळापत्रक
नागपूर ते पडमढी
सायंकाळी 5.30 वाजता, 6 वाजता, 6.30 वाजता, 7 वाजता, 7.30 वाजता, 8 वाजता, 8.30 वाजता, 9 वाजता, 9.30 वाजता आणि रात्री दहा वाजता.
पडमढी ते नागपूर
दुपारी 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 6.30 वाजता, 7 वाजता, 7.30 वाजता, 8 वाजता, 9 वाजता आणि रात्री दहा वाजता.
अनेकांकडून पूर्ण बसचीच बुकिंग
शहरातील अनेक भागातील मंडळ आणि भाविकांकडून पूर्ण बसची बुकिंग करण्यात येते. तर काही भक्तांकडून इतरांना यात्रा घडवून आणण्यासाठी बुकिंग करुन नागरिकांना निशुल्क यात्रा घडविण्यात येते. यासंदर्भातील विचारपुस दरवर्षीप्रमाणे यंदाही सुरु असून नागरिकांना बसेसची कमतरता पडणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.