Sushil Kumar Shinde : जानेवारी 2013 मध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 'हिंदू दहशतवाद' या विषयावर वादग्रस्त विधान केले होते. काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशीच्या भाषणात शिंदे यांनी भगवा दहशतवादाचा उल्लेख केला होता. काही भगव्या संघटना दहशतवाद पसरवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे चालवत असल्याचे गृह मंत्रालयाच्या तपासात समोर आले आहे, असे ते म्हणाले होते. शिंदे यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, 'तपासादरम्यान भाजप आणि आरएसएस दहशतवाद पसरवण्यासाठी दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे चालवल्याचे वृत्त आले आहे. समझौता एक्स्प्रेस, मक्का मस्जिदमध्ये बॉम्ब पेरण्यात आले आणि मालेगावमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आले. याचा गांभीर्याने विचार करून सावध राहावे लागेल. शिंदे यांचे हे विधान त्यावेळी वादग्रस्त ठरले होते.
तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का?
तेव्हापासून सातत्याने सुशीलकुमार शिंदे यांनी खुलासा केला, असला तरी विरोधकांकडून सातत्याने टीका होतच असते. आज सोलापूरमध्ये बोलताना पुन्हा एकदा त्यांनी या प्रकरणावरून भाष्य केले. ते म्हणाले की, काही लोकांनी मी हिंदू दहशतवाद शब्द वापरला म्हणून माझ्यावर टीका केली. मी देशाचा गृहमंत्री होतो, जे रेकॉर्डवर आलं आहे ते सांगायचं नाही, तर मी माझ्या पॉकेटमधील सांगायचं का? या माझ्याबरोबर बसा, मी तुम्हाला समजाऊन सांगतो, असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. सोलापुरातील पद्मशाली समाज मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदेनी वापरलेल्या हिंदू दहशतवाद शब्दावरून बराच वाद झाला होता.
दरम्यान, शिंदे यांनी त्यांच्या 'फाइव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स' या पुस्तकात या घटनेचा उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्रालयाने तयार केलेले गोपनीय दस्तऐवज वाचून 'भगवा दहशतवाद' हा शब्दप्रयोग केला असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे प्रकरण भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याशी संबंधित असल्याने त्यांनी जाहीरपणे बोलण्यापूर्वी आरोपांची सत्यता पडताळून पाहिली, असेही शिंदे म्हणाले. शिंदे त्यांच्या पुस्तकात लिहितात, 'माझ्या त्या काळातील मीडिया स्टेटमेंट्स कोणी पाहिलं तर त्यांना दिसेल की मी 'भगवा दहशतवाद' हा शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरला होता.'
इतर महत्वाच्या बातम्या