Mumbai News: "सोलापूरला जागतिक स्तरावर गारमेंट हब बनवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. कौशल्य प्रशिक्षण केंद्राची सोलापूरची मागणी तातडीने पूर्ण केली जाईल", अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या वेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री आणि सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. "या प्रदर्शनाला देश-विदेशातून उत्तम प्रतिसाद मिळत असून आता ते जागतिक स्तरावर नेण्याचा मानस आहे", असे देशमुख म्हणाले.
सोलापूरला जागतिक गारमेंट हब करणार
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (SGMA) आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्या सहकार्याने आयोजित या फेअरमध्ये 150 हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ब्रँड्स सहभागी झाले आहेत. 30,000 युनिफॉर्म डिझाईन्स आणि 15000 फॅब्रिक इनोव्हेशन्सचे प्रदर्शन येथे होणार आहे. देशातील युनिफॉर्म उद्योगातील पहिला AI आधारित व्हर्च्युअल फॅशन शोसुद्धा यामध्ये आयोजित करण्यात आला आहे.जागतिक स्तरावरील 65 अब्ज डॉलर्सच्या युनिफॉर्म मार्केटमध्ये नवीन संधी निर्माण करणारे, “मेक इन इंडिया”ला बळ देणारे हे एक महत्त्वाचे B2B व्यासपीठ मानले जात आहे. हे प्रदर्शन 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सुरू राहणार आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना नार्वेकर म्हणाले, "सोलापूरकडे जागतिक गारमेंट हब होण्यासाठी आवश्यक सर्व क्षमता आहे. कामगार उपलब्धता, उत्पादन क्षमता, विमानतळाची सुविधा सगळ्या गोष्टी या उद्योगाला अनुकूल आहेत. सोलापूरचा विकास हे आमचं प्राधान्य असून सर्व मागण्यांचा विधिमंडळात पाठपुरावा केला जाईल."
मोठ्या B2B नेटवर्किंगसाठी महत्त्वाचा मैलाचा दगड
कौशल्य प्रशिक्षण केंद्रासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "जोपर्यंत प्रशिक्षण केंद्र सुरू होत नाही, तोपर्यंत जागतिक स्पर्धा कठीण राहील. यासाठी मी स्वतः लक्ष घालीन."
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे फेअर चेअरमन अजय रंगरेज म्हणाले, "2017 पासून सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन उद्योगाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्याने काम करत आहे. यावर्षीचा फेअर मोठ्या B2B नेटवर्किंगसाठी महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे."
सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव श्रीकांत अंबुरे यांनी सांगितले की, "तंत्रज्ञान, डिझाईन आणि गुणवत्तेच्या संगमातून हा फेअर उद्योगातील भविष्यासाठी दिशादर्शक ठरेल." 2017 मध्ये सोलापूरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाचा प्रवास आज मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि वाराणसीपर्यंत पोहोचला आहे. देशातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित युनिफॉर्म B2B व्यासपीठ म्हणून याने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या तीन दिवसीय फेअरमुळे युनिफॉर्म उद्योगात नवीन भागीदारी, नव्या डिझाईन्स आणि तांत्रिक आदानप्रदानासाठी मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे आयोजकांनी सांगितले.