Solapur Accident: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील (solapur accident) शेळगाव येथे गुरुवारी दुपारी अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडलीय. अवघ्या 4 वर्षांच्या शिवराज शेरखाने चिमुकल्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गावात विहिरीतून मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. त्याचवेळी लहानगा शिवराज खेळता खेळता तिथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर चढला. त्याच्या हातून चुकून ट्रॅक्टरचा गिअर पडला आणि ट्रॅक्टर सरळ विहिरीत कोसळला. बेचक्यात अडकल्यानं मुलाला वाचवणं अशक्य ठरलं. तब्बल 12 तासांनी मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात मोठे खळबळ उडाली होती. 

Continues below advertisement

Solapur Accident: नेमकं घडलं काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतील शेळगाव परिसरात विहिरीतून मोटार बाहेर काढण्याचे काम सुरू होते. विहिरीजवळ ट्रॅक्टर उभा ठेवण्यात आला होता. याच वेळी जवळच खेळत असलेला छोटा शिवराज खेळता खेळता ट्रॅक्टरवर चढला. चुकून हात लागल्याने गिअर पडला आणि क्षणार्धात ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. काही सेकंदात घडलेली ही दुर्घटना पाहून सभोवतालचे लोक हादरून गेले.

Continues below advertisement

घटनेनंतर शिवराजचे वडील संदिप शेरखाने यांनी मुलाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी तत्काळ विहिरीजवळ धाव घेत आतमधील परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न केला. गावातील युवकांनीही कसलीही पर्वा न करता विहिरीत उड्या मारत शिवराजचा शोध सुरू केला. या वेळी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनाही कळवण्यात आले.

बेचक्यात अडकला, बारा तासांनी मृतदेह बाहेर

घटनास्थळावर तात्काळ पोहोचलेल्या अग्निशमन आणि पोलीस पथकाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मात्र विहिरीत खाली अडकलेला ट्रॅक्टर, खोल पाणी आणि चिखल यामुळे शोध कार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. ट्रॅक्टर बाहेर काढणे अशक्य असल्याने प्रथम विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी गावकऱ्यांची मोठी मदत मिळाली.

सलग 12 तासांच्या अखंड प्रयत्नांनंतर अखेर विहिरीतील बहुतांश पाणी बाहेर काढण्यात यश आले. पाणी कमी झाल्यावर शिवराजचा मृतदेह विहिरीच्या तळाशी दिसून आला आणि त्याला बाहेर काढण्यात आले. निष्पाप बाळाचा अशाप्रकारे झालेला मृत्यू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अवघ्या चार वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे गावकरीही हळहळ व्यक्त करत आहेत.