Ujani Dam Water Issue : उजनीच्या पाण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात टोकाचा संघर्ष सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सोलापूरचे हक्काचे पाणी नेल्याच्या विरोधात  जिल्ह्यात मोठा संघर्ष सुरु आहे. यातच आता राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असलेलं सरकार गेल्यानं पुन्हा आंदोलक आक्रमक होऊ लागले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच सोलापूरचे पालकमंत्रीपद आमदार तानाजी सावंत यांना द्यावं अशी मागणी उजनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी केली आहे. त्यामुळं मंत्री कोण होणार याची अजून चर्चाही नसताना उजनीच्या पाण्यासाठी आंदोलकांनी पालकमंत्री देण्याची मागणी केली आहे. 


तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. गेल्या सरकारच्या काळात त्यांच्याकडे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यावेळी जिल्ह्यातील उजनीच्या पाण्यावर कोणालाही डल्ला मारु दिला नव्हता. मात्र, त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारमध्ये तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीचे पाणी इंदापूर आणि बारामतीला वळवण्याच्या योजनेस मंजुरी घेतल्यावर सोलापूर जिल्ह्यात मोठं आंदोलन सुरु झालं होतं. आता नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही योजना रद्द करण्यासाठी तानाजी सावंत हेच जिल्ह्याचे पालक ठरतील अशी भावना उजनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी मांडली आहे.


येत्या काही दिवसात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित असून, यात तानाजी सावंत यांच्यावर मोठी जबाबदारी येणार असल्याचे माध्यमातून समोर येत असल्याचे खूपसे यांनी सांगितलें. तानाजी सावंत यांना कोणतेही मंत्रिपद मिळाले तरी उजनीच्या पाण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्रिपद मात्र तानाजी सावंत यांनाच देण्यात यावं अशी मागणी आम्ही संघर्ष समितीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केल्याचे खूपसे यांनी सांगितलं. एकंदर कायम दुष्काळी असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरण हे वरदायिनी ठरले आहे. आता राज्यात सत्ता बदल झाल्यावर सोलापूरच्या हक्काचे पाण्यासाठी आंदोलक पुन्हा सक्रिय झाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या: