पंढरपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालच्या पंढरपूर दौऱ्यात शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर सहभागी झाल्याने आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जोरदार चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र एकनाथ शिंदे हे जमिनीवर असलेले आणि निरपेक्षपणे काम करणारे नेते असून त्यांच्या काळात अनेक चांगली कामे झाली आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतही एकनाथ शिंदे हेच निर्णय घेऊ शकतील म्हणून आपण शिंदे यांची भेट घेतल्याचा खुलासा माळशिरसचे शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.
न्याय शिंदेच देऊ शकतील
यापूर्वीही एकनाथ शिंदे यांची आळंदी येथे आणि आता पंढरपूर मध्ये म्हणजे दोन्हीही पवित्र ठिकाणी भेट झाली आहे. शिंदे हे नेहमीच त्यांनी घेतलेले निर्णय पूर्ण करतात आणि यामुळेच शेतकरी कर्जमाफीचा न्याय शिंदेच देऊ शकतील असा दावा जानकर यांनी केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जेव्हा येत असतात तेव्हा मतदार संघातील आरोग्याची किंवा इतर अडचणीची कामे करून घेण्यासाठी त्यांची भेट घ्यावी लागते आणि म्हणूनच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे जानकर यांनी सांगितले. जानकर यांच्या जात प्रमाणपत्रामुळे त्यांची आमदारकी अडचणीत आल्यानेच त्यांनी शिंदेंची भेट घेतल्याची चर्चेबाबत त्यांना छेडले असता जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी ती अडचण मला 2019 च्या निवडणुकीत येईल. एकदा विधानसभेला कागदपत्राची छाननी झाल्यानंतर माजी आमदारकी पाच वर्षे कोणी रद्द करू शकत नाही असा टोला जानकर यांनी विरोधकांना लगावला. जरी माझे जात प्रमाणपत्र रद्द झाले तरी हीच लोकी पुन्हा मला माझे जात प्रमाणपत्र आणून देतील आणि निवडणुकीत उभे करतील असा टोला सत्ताधाऱ्यांना आमदार जानकर यांनी लगावला.
आमदार उत्तमराव जानकार हे चळवळीतील धडाकेबाज नेता अशी त्यांची ओळख आहे. मारकडवाडी येथे झालेल्या ईव्हीएम आंदोलन असू किंवा निवडणूक काळात अजित पवारांपासून बड्या नेत्यांवर जोरदार आरोप करणे असो उत्तमराव जानकर हे नेहमीच आपल्या बेधडक विधानाने राज्यात प्रसिद्ध झाले आहेत. आता त्यांनी त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.