Solapur: ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्यांकडून साखर कारखाने आणि ऊस वाहतूकदार यांची कोट्यावधीच्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार दरवर्षी समोर येत आहे. याच्या विरोधात शेकडो गुन्हे राज्यभरात दाखल केले असले तरी अशा फसवणुकीतून हजारो वाहतूकदार देशोधडीला लागल्याचे वास्तव आहे. ऊस तोडणी साठी एकाच वेळी एकापेक्षा जास्त कारखाने आणि वाहतूकदार यांच्याकडून लाखो रुपयाची रक्कम घेऊन करार केले जातात. मात्र यामधील प्रत्येकाला विविध पद्धतीने गंडा घालण्यात येत असतो. प्रत्येक हंगामात राज्यभरातून 100 कोटी पक्षा जास्त रुपयाची फसवणूक समोर येत असते मात्र यावर कोणतेही ठोस कारवाई होत नाही. यातूनच ऊस वाहतूक करणारे हजारो शेतकरी कुटुंब देशोधडीला लागले आहेत. आता याला पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत आणून चाप बसविण्याचे काम एका तरुणाने केले असून त्यांनी बनविलेल्या अभिनव ॲपमुळे आता ही फसवणूक टाळता येणार आहे.
नेमकं होणार काय?
राज्यात जवळपास 260 साखर कारखान्यांचा डेटा आणि सर्व आधार कार्ड तपासणीची व्यवस्था या अभिनव ॲप मध्ये असणार आहे. प्रत्येक हंगामाला साधारण दहा लाख ऊस तोडणी मजूर हे महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात मध्ये येत असतात. या तोडणी मजुरांना आणण्याचे काम प्रत्येक टोळीचे मुकादम करीत असतात. हे मुकादम ऊस तोडणी साठी साधारण 15 लाख रुपये दहा कोयत्यांसाठी घेऊन करार करतात. मात्र यांना पैसे देणारे हजारो वाहतूकदार संघटित नसल्याने एकाच मुकादमाकडून अनेक वाहतूकदारांची करार करून फसवणूक होत असते. ही फसवणूक टाळण्यासाठी आता आबासाहेब कांबळे यांनी बनविलेल्या या अभिनव ॲप मध्ये ज्या टोळीशी एखाद्याने करार केला तर त्याचा सर्व डेटा या ॲपमध्ये राहणार आहे. ज्यामुळे दुसरा वाहतूकदार केवळ या टोळीतील मुकादम अथवा तोडणी कामगाराचे आधार कार्ड नंबर टाकून याने कोणाचे पैसे घेतले आहेत हे पाहू शकणार आहे. ज्यामुळे आता टोळीचा मुकादम अथवा ऊस तोडणी मजूर एकाच वेळी अनेकांचे पैसे घेऊ शकणार नाही.
लाखो रुपयांच्या फसवणुकीला आळा बसू शकणार
याचा फायदा महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यातील साखर कारखानदार आणि ऊस वाहतूकदार यांना होणार आहे. यासाठी वाहतूकदारांना केवळ हे ॲप आपल्या फोनवर गुगल प्ले स्टोअर वरून घ्यावे लागणार आहे. जो वाहतूकदार एखाद्या टोळीशी 15 लाख रुपये देऊन करार करायला जातो त्याला स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी केवळ 500 ते 600 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये असणाऱ्या आधार कार्ड व्हॅलिडीटी साठी जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च कारखान्याला किंवा ऊस वाहतूक दाराला करावा लागणार आहे. मात्र यामुळे होणाऱ्या संभाव्य लाखो रुपयांच्या फसवणुकीला आता पूर्णपणे आळा बसू शकणार आहे. हे ॲप संपूर्ण आयटी कायद्याच्या चौकटीत बनविण्यात आल्याने दरवर्षी होणारी कोट्यावधी रुपयांची फसवणूक या ॲपमुळे बंद होणार तर आहेच याशिवाय पोलीस प्रशासनालाही अशा गुन्ह्यांच्या विरोधात कायदेशीर पुरावे मिळणार आहेत.
मुकादम आणि मजुराची इत्यंभूत माहिती मिळू शकणार
आता लवकरच यावर्षीचा साखर हंगाम सुरू होत असताना कांबळे यांनी बनविलेले ॲप साखर कारखाने आणि ऊस वाहतूकदार यांच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. प्रत्येक वाहतूकदाराला आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी हे ॲप घेऊन कोणाशीही करार करायला जाताना त्याचा संपूर्ण डेटा या ॲप मध्ये टाकल्यास त्याला ऊस तोडणी साठी येणारा मुकादम आणि मजुराची इत्यंभूत माहिती मिळू शकणार आहे. राज्य सरकारने दरवर्षी होणाऱ्या अशा कोट्यावधीच्या फसवणुकीविरोधात कायदा करण्याची घोषणा केली असली तरी अजूनही यात कोणतीही प्रगती झालेली नाही. मात्र बाबासाहेब कांबळे यांनी केलेल्या या अभिनव ॲपमुळे आता कारखाना आणि ऊस वाहतूकदारांना मात्र स्वतःच्या फसवणुकीपासून सावध करणारे हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे.