Solapur:सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणपती विसर्जनाच्या आनंदी वातावरणात दुर्दैवी घटना घडले असून कल्लकर्जाळ गावातील एक तरुण नदीत वाहून गेला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल रेवप्पा कोळी (वय 18, रा. कल्लकर्जाळ) हा आपल्या मित्रासोबत गावातील गणपती विसर्जनासाठी गेला होता. रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विसर्जन सुरू असताना अनिलचा पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्यात पडला. त्या वेळी नदीत मोठा प्रवाह होता. पाण्याचा जोर जास्त असल्याने अनिल वाहून गेला.
शोधकार्य सुरू,गावात शोककळा
घटनेची माहिती गावकऱ्यांनी तात्काळ पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला दिली. माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत नदीत शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप अनिलचा शोध लागलेला नाही. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरुणाचा असा दुर्दैवी अंत होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. अनिलच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून विसर्जनाचा उत्साह क्षणात शोकमय झाला.
प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, नदी-नाल्यांमध्ये विसर्जनासाठी जाताना काळजी घ्यावी. पाण्याचा प्रवाह जोरात असताना आत न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच विसर्जनासाठी सुरक्षित स्थळांचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पुराचं पाणी बघायला गेला, पाय घसरुन तरुण बुडाला, तीन दिवसांनी मृतदेह सापडला
हिंगोली जिल्ह्यातील जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे शहरात शोककळा पसरली आहे. पूर पाहण्यासाठी नदीकाठावर गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि वाहून गेला. अखेर तब्बल तीन दिवसांच्या शोधानंतर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला.
मृत तरुणाचे नाव शेख अरबाज शेख फेरोज (वय 18, रा. महादेववाडी, हिंगोली) असे आहे. 29 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला प्रचंड पूर आला होता. या दरम्यान अनेक जण नदीकाठावरून पाण्याचा तडाखा पाहत होते. त्याचवेळी अरबाजचा पाय घसरून तो थेट नदीत कोसळला. भोवतालच्या नागरिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड प्रवाहामुळे तो काही क्षणांत वाहून गेला