Solapur Pune Highway Udgir-Pune Bus Accident News: काळ आला पण वेळ नाही, या म्हणीचा अर्थ उदगीर-पुणे बसमधील 40 प्रवाशांना आला. पण एका तरुणाच्या प्रसंगावधानाने या एसटी बसला उजनी धरणात जलसमाधी मिळण्यापासून रोखलं.  या बसमध्ये असणाऱ्या 40 प्रवाशांचा जीव त्या तरुणामुळे वाचला आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील सुधीर रणे या प्रवाशाने 40 प्रवाशांचे प्राण वाचवले.


उदगीरहून पुण्याला निघालेली रातराणी बस, सोलापूर पुणे महामार्गावर भिगवण-पळसदेव दरम्यान आलेली असताना हा प्रकार झाला. वेळ रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान.. सर्व प्रवासी झोपेत असतानाच अचानक बस रस्त्यावरील सुरक्षारक्षक लोखंडी गार्डला धडकल्याचा मोठा आवाज आला अन् बसमधील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. प्रवाशांनी पाहिलं तर बस चालकाने स्टेअरिंगवर मान टाकलेली. त्यानंतर भीतीने प्रवाशांमधून आरडाओरड सुरू झाली.  याचवेळी एका युवकाने प्रसंगावधान दाखवून,  धाडसाने बसच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला. या युवकाचं नाव सुधीर रणे.. त्यांना बस चालवण्याचा आहे. आपल्या ड्रायव्हिंगच्या अनुभवाचा वापर करत सुधीर रणे यांनी हँडब्रेकवर बस थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. हा अंगावर शहारे आणणारा थरार घडला सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पळसदेव हद्दीत..
 
उदगीर डेपो मधून पुण्याकडे निघालेली बस नंबर (MH 24 AU 8065) मधून साधारण 40 प्रवाशी प्रवास करत होते. इंदापूर ओलांडून एसटी बस सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून पळसदेव  गावाच्या हद्दीत आल्यावर रात्री अकरा वाजताच्या सुमारास बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना अचानक हार्ट अटॅक आला. त्यामुळे ते बस चालू असताना स्टिअरिंगवरच कोसळले. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी गार्डला धडकली.. त्यानंतर सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचवेळी बसमधील प्रवाशी सुधीर रणे या प्रवाशाने प्रसंगावधान दाखवत स्टिअरिंगचा ताबा घेतला अन् मोठा अपघात टळला. 40 प्रवाशांचे प्राण त्यानं वाचवले. 


सुदैवाने वेळीच बस नियंत्रणात आली अन्यथा बस महामार्गाच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर जाऊन किंवा उजनी जलाशयाच्या बॅकवॉटरमधील पाण्यात जाऊन पलटी झाली असती तर, अनर्थाचा विचारच न केलेला बरा. प्रवाशी सुधीर रणे आणि वाहक संतोष गायकवाड यांनी हार्ट अटॅक आलेले बस चालक गोविंद सूर्यवंशी यांना बोनेटवर झोपवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात चालक गोविंद सूर्यवंशी शुद्धीवर आले आणि पुन्हा बेशुद्ध झाल्याने सुधीर रणे यांनी अँब्युलन्सची वाट न पाहता बस घेऊन भिगवण येथील यशोधरा हॉस्पिटल गाठलं. सूर्यवंशी यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये आणल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होऊ शकले.