सोलापूर:  सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठी कारवाई केली आहे. मेफेन टरमाईन या औषधाची अवैधपणे विक्री केल्याने माळशिरस तालुक्यातील तीन औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्यांचे परवाने देखील रद्द करण्यात आले. या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  त्याचं कारण आहे अवैधपणे विक्री करण्यात आलेले मेफेन टरमाईन हे पैलवानांना विकल्याचं समोर येत आहे. 


महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई पाहता कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. मेफेन टरमाईन हे जास्तीत जास्त 300 रूपयांना डॅाक्टर विकत घेतात. या इंजेक्शनची डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि बिलाशिवाय विक्री करता येत नाही. सध्या काळ्या बाजारात हे इंजेक्शन दिड हजार रूपयांना सहज विकत मिळतो. 


अन्न आणि औषध प्रशासनाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार हे सर्व इंजेक्शन तालमीत कुस्ती करणाऱ्या पैलवानांना विकण्यात आले आहेत. सोलापुरच्या अन्न आणि औषध प्रशसनाने 5 डिसेंबर 2022 माळशिरस तालुक्यातील या तीन ही मेडिकल्सची तपासणी केली. अवैध पद्धतीने मेफेन टरमाईन विकल्याने या औषध विक्रेत्यांना खुलासा सादर करण्याच्या नोटीस देण्यात आल्या. विक्रेत्यांकडून आलेला खुलासा असमाधानकारक असल्याने 21 डिसेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यानंतर 30 डिसेंबर 2022 रोजी या तीन ही मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र औषध विक्रेत्यांनी आपल्या खुलाशात पैलवांनाना हे औषध विकल्याचे सांगितलय. 


रक्तदाब वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या इंजेक्शनचा वापर पैलवान का करत असतील असा प्रश्न तुमच्या मनातही निर्माण झाला असेल. 



  • इंजेक्शन घेतल्याने रक्तदाब वाढतो. परिणामी कुस्तीसाठी दम वाढतो.

  • शरीर दणकट होते, अतिरिक्त ताकद येते. 

  • मनात असलेली भीती कमी होते. 

  • इंजेक्शन घेतल्याने स्पर्धेत यश मिळतेच ही मानसिकता 


वैद्यकीय तज्ञांच्या मते मेफेन टरमाईन हे औषध केवळ ऑपरेशन थेटरमध्ये वापरले जाते. तेही अतिशय कमी प्रमाणात वापरले जाते. या औषधाचा अति वापर झाल्यास व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. 


कुस्ती म्हणजे तांबड्या मातीतला रांगडा खेळ आहे. मात्र याच कुस्तीला मागील काही वर्षांपासून डोपिंगची कीड लागली आहे. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यापुर्वी सोलापुरात ही कारवाई करण्यात आली आहे.  डोपिंगचा हा विळखा महाराष्ट्र केसरीपर्यंतही आहे असा दावा धैर्यशील मोहिते पाटलांचा आहे. धैर्यशिल स्वत: संघटनेचे पदाधिकारी आहेत. खरंतर कुस्ती हा मेहनतीचा खेळ.. जुने पैलवान अंगमेहनतसह तितका सराव करायचे. पैलवानाच्या बलदंड शरिरामागचे देशी आहार हे रहस्य होते. अलिकच्या दशकात  मात्र या क्षेत्रात डोपिंग घेणारी अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे. मोठ्या जोडीतल्या पैलवानांना देखील याची चटक लागल्याचं सांगितलं जातंय. स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणारे  कांही तरूण हे इंजेक्शन वापरत असल्याची शंका आहे. त्यामुळे प्रत्येक कुस्ती सामन्याआधी डोपिंग चाचणीची मागणी होतेय. 


माळशिरस तालुक्यातील अवैधपणे मेफेन टरमाईन विक्री करणाऱ्या तीनही मेडिकलवर प्रशासनाने कारवाई केलीय. मात्र महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीत याचे प्रमाण वाढतंय हे जास्त गंभीर आहे. या अशा औषधांमुळे कित्येक पैलवानांचे आयुष्य बरबाद होण्याची शक्यता देखील नाकरता येणार नाही.