Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) थैमान घातल्याचे चित्र आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मोहोळ (Mohol) तालुक्यातील शिरापूर गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जनावरांच्या गोठ्याचा काही भाग कोसळून त्याखाली अडकलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तानुबाई मारुती गायकवाड असे वृद्ध महिलेचे नाव आहे. (Solapur News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. याच दरम्यान तानुबाई गायकवाड या आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात बसलेल्या होत्या. पावसाचा जोर वाढत असताना अचानक गोठ्याचा काही भाग कोसळला आणि तानुबाई गायकवाड या त्याखाली अडकल्या.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अवस्थेत सापडल्या
संध्याकाळी त्यांचे कुटुंबीय शेतात गेले असता त्यांना तानुबाई या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अवस्थेत सापडल्या. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना बाहेर काढून मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात (Mohol Police Station) या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
अवकाळीने 22,233 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
दरम्यान, राज्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे 85 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सुमारे 22,233 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पावसामुळे मका, ज्वारी, भाजीपाला, संत्रा, भात, आंबा यांसह विविध फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाचा सर्वाधिक प्रभाव अमरावती, जळगाव, नाशिक, चंद्रपूर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये दिसून आला आहे. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
सात जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (दि. २५ मे) कोकण-गोवा परिसरातील बहुतांश भागांबरोबरच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. विशेषतः रायगड, पुणे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासोबत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. परिणामी, या सातही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आणखी वाचा