Maharashtra Karnataka Border Dispute :  सोलापुरातल्या अक्कलकोटमधील (Solapur Akkalkot Kannad School) कन्नड शाळेच्या 32 विद्यार्थीनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची (Cm Eknath Shinde) भेट घेणार आहेत. आम्हाला कर्नाटकात जायचे नाही असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ह्या विद्यार्थिनी निवेदन देखील देणार आहेत. इतकंच नाही तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी देखील या विद्यार्थिनी प्रयत्न करणार आहेत. अक्कलकोट तसलुक्यातील मैंदर्गी येथील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील पाचवी ते सातवी शिकणाऱ्या ह्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत.


महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याच अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावाच्या जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळेच्या या विद्यार्थिनी आहेत. सीमावादाचा मुद्दा पाहता आपल्याला कर्नाटकात जायचे नसून महाराष्ट्रातच राहायचे असल्याची इच्छा इथल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 


दरवर्षी या शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी स्वखर्चातून शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवत असतात. मागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी विद्यार्थिनींसाठी मुंबई ते बेंगलोर असा विमान प्रवास बुक केला होता. त्यातच सीमा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कन्नड शाळेच्या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्र्यांना भेटून महाराष्ट्रातच राहणार असल्याचे निवेदन देण्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक कट्टीमनी यांनी दिली.


रविवारी रात्री सोलापूर येथून रेल्वेने या विद्यार्थिनी मुंबई येथे जातील. सोमवारी सकाळी आमदार निवास येथे मुक्काम करून दुपारून विधिमंडळला ह्या सर्व विद्यार्थिनी भेट देणार आहेत. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी देखील विधानसभेच्या अध्यक्षांना या संदर्भात पत्र लिहिल्याची माहिती आहे. यानिमित्ताने राज्याचे विधिमंडळ या विद्यार्थिनींना पाहता येणार आहे. दुपारी मुख्यमंत्र्यांच्या भेटण्याची वेळ मागितली असून त्यांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी दिली. 


महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर मंगळवारी सकाळी ह्या विद्यार्थिनी बेंगलोरला जाणार आहेत. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीना विमान प्रवास करता यावा यासाठी मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी स्वखर्चातून मुंबई ते बंगळूरु प्रवासाठी विमान तिकीट देखील काढले आहेत. मंगळवारी या सर्व विद्यार्थिनी बंगळूरू येथे जातील. तिथे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची देखील भेट घेण्याचे प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक महांतेश कट्टीमनी यांनी दिली.



इतर महत्वाच्या बातम्या