English Channel : अत्यंत खडतर व शारिरीक, मानसिक कसोटी पाहणारी इंग्लिश चॅनल स्विम अर्थात इंग्लिश खाडी (English Channel) पोहून दुसऱ्यांदा पार करण्याची मोठी कामगिरी पंढरपूरच्या सोळा वर्षीय सुपुत्राने केली आहे. यामुळे पंढरीचा डंका दुसऱ्यांदा साता समुद्रापार वाजला आहे.


एका बाजूला शालेय परिक्षा आणि दुसऱ्या बाजूला पोहण्याची आवड यातून पंढरपूरचा रहिवासी असलेल्या 16 वर्षीय सहिष्णू जाधव याने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी (English Channel) पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला आहे. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य होतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून खाडी पार करणारा सहिष्णू याला अपवाद ठरला आहे. या धाडसी जलतरणपटूने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा पराक्रम पहिल्यापेक्षा कमी वेळात करून दाखवला आहे. वारकरी संप्रदायाचे घराणे असणाऱ्या सहिष्णूचा हा पराक्रम अभिमानास्पद आहे. 


गेल्या वर्षी, सहिष्णूने सहा व्यक्तींच्या टीमसोबत 16 तासांच्या संघर्षानंतर इंग्लिश खाडी (English Channel) पार केली होती. यावर्षी त्याने तीन जणांच्या टीमसोबत मागच्या वर्षीपेक्षा कमी वेळेत म्हणजे 15 तास 8 मिनिटांत हे अंतर पार केले आहे. सहिष्णू हा दोन वेळाइंग्लिश खाडी (English Channel) पार करणारा सर्वात तरुण भारतीय असून आजवरच्या इतिहासात केवळ 65 भारतीयांनी इंग्लिश खाडी (English Channel) पोहत पार केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मान उंचावली आहे. त्याचबरोबर असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देखील दिली आहे. सहिष्णूच्या या पराक्रमाची दाखल साहेबांच्या इंग्लिश माध्यमांनीही घेतली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


"ओपन वॉटर स्विमिंग हा मुळातच अवघड क्रीडा प्रकार असून त्यात इंग्लिश खाडी  (English Channel)  ही अत्यंत खडतर अशा परिक्षेला सामोरे जायला लावणारी असते. या पूर्ण प्रवासात सहिष्णूला त्याच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही मर्यादा वाढवाव्या लागल्या. समुद्र मला मागे खेचत होता तर मी स्वतःला पुढे ढकलत होतो अशा शब्दात सहिष्णू याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  


जलतरण इतिहासातील प्रवास



सहिष्णूचा जलतरणातील प्रवास मागील वर्षी म्हणजे त्याच्या वयाच्या 15व्या वर्षी सुरु झाला. इंग्लिश खाडी, वाहते प्रवाह (currents) आणि अनिश्चित हवामान हे त्याच्या प्रसिद्ध वैशिष्ट्यांपैकी आहेत, जलतरणपटूंसाठी ही एक आव्हानात्मक परिक्षा असते.


प्रशिक्षण आणि अभ्यासाचे संतुलन


सहिष्णूचे  प्रशिक्षण कठोर होते, त्याच्या प्रशिक्षकांनी त्याची  कौशल्ये आणि मानसिक तग धरण्याची क्षमता वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्याच्या प्रशिक्षणामध्ये लांब अंतराचे जलतरण, थंड पाण्यातील प्रशिक्षण, आणि खाडीच्या स्थितीचे अनुकरण समाविष्ट होते. टीमचे जलतरण 29 जुलै रोजी पहाटे सुरु झाले आणि प्रवाह, तापमान बदल, आणि थकव्याच्या अडचणींना तोंड देत त्यांनी हा प्रवास संध्याकाळी पूर्ण केला.


जलतरणाची आव्हाने



29 जुलैच्या जलतरणात खूप आव्हाने होती. शेवटच्या दोन तासांत सात फुटांच्या मोठ्या लाटा आणि प्रवाह होते. ज्यामुळे पायलटला जलतरण रद्द करावे लागेल अशी परिस्थिती शेवटच्या काही तासांमधे निर्माण झाली होती. प्रवाह, वारे, आणि मोठ्या लाटांमुळे मार्ग साधारणपणे इंग्रजी S आकाराचा असतो. हा प्रवास 21 मैलांचा होता, पण प्रवाह आणि उच्च लाटांमुळे 29.8 मैल (48 किमी) झाला.
     
सहिष्णूचे यश भारत भरातील तरुण खेळाडूंना मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा देईल. त्याची कथा दृढ संकल्पाची आणि स्वतःच्या क्षमतेवरच्या अविचल विश्वासाची साक्ष आहे. यश साध्य करण्यासाठी वयाचा अडथळा नसतो. समर्पण आणि कष्टाने स्वप्ने साकार होतात. सहिष्णूचे इंग्लिश खाडी जलतरण रिलेमधील अद्वितीय कर्तृत्व भारतासाठी, पंढरपूरला आणि महाराष्ट्रासाठी अपार अभिमानास्पद आहे. आता सहिष्णूने लवकरच एकट्याने इंग्लिश खाडी (English Channel) पार करण्याचे लक्ष निश्चित केले आहे.