Solapur Latest News Udpate : सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सहकारी न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने निरोप दिला. 32 वर्षाच्या प्रदीर्घ न्यायिक सेवेतून सेवानिवृत्त होणारे डॉ. शब्बीर अहमद औटी यांना निरोप देताना सर्वांनाच गहिवरून आले होते. तर आपल्या सहकाऱ्यांना दिलेला हा निरोप स्वीकारताना डॉ. औटी यांना देखील अश्रू अनावर झाले. जन्मतः दिव्यांग असूनही अधिक कार्यक्षमता, गुणवत्ता आणि संवेदनशीलता जपत न्यायदानाचे कार्य केलेले न्या. डॉ. औटी यांना निरोप देताना संपूर्ण न्यायालयातील सहकारी न्यायाधीश, वकिलांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. प्रेमाचा निरोप घेताना न्या. डॉ. औटी यांच्याही नेत्रांतून अश्रूधारा बरसल्या.
जन्मत: दिव्यांग असलेले डॉ. शब्बीर अहमद औटी यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय सर्वसाधारण होती. मात्र आपल्या दिव्यांगतेचा बाऊ न करता कुशल बुद्धीमत्तेच्या आधारे औटी 32 वर्षापूर्वी न्यायिक सेवेत दाखल झाले. त्यांच्या न्यायकारकिर्दीची सुरुवात देखील सोलापुरातच न्यायाधीश म्हणून झाली होती. न्या. डॉ. औटी यांची न्यायदान क्षेत्रातील कारकीर्द उत्तुंग ठरली. अनेक प्रलंबित खटले निकाली काढताना प्रशासकीय कामकाजाचा आवाका उल्लेखनीय ठरला. अनेक महत्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले. अधिक कार्यक्षमता, गुणवत्ता आणि संवेदनशीलता जपत न्यायदानाचे केलेल्या कार्याचे अनेक उदाहरण सोलापूर जिल्हा न्यायालयात चर्चेचे विषय ठरले. त्याचीच प्रचिती त्यांच्या निरोप समारंभत देखील पाहायला मिळाली..
30 जून रोजी डॉ. शब्बीर अहमद औटी यांच्या सेवाकाळातील शेवटच्या दिवशी अनोख्या पध्दतीने स्वागत केले. न्यायालयात कार्यरत असलेले सहयोगी न्यायाधीश, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारापासून दुतर्फा उभे राहून ओंजळीत गुलाबाच्या पाकळया आणि फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. ज्या दालनातून डॉ. शब्बीर अहमद औटी यांनी न्यायदानाचे काम केले त्या दालनाच डॉ. औटी यांनी दोन्ही हात जोडून अभिवादन केलं. सहकाऱ्यांनी दिलेला हा निरोप पाहून डॉ. औटी यांना देखील आनंदाश्रू अनावर झाले.
जुलै 2022 मध्ये दिव्यांग पक्षकाराला पाहून न्यायाधीक्ष डॉ. शब्बीर अहमद औटी स्वत: आपले डायस सोडून खाली आले होते. पक्षकाराची बाजू ऐकून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादावर त्यांनी तोडगा देखील काढला होता.