सोलापूर: सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी सोलापुरात (Solapur Crime News) पोलिसांनी गाडीवर गोळीबार केला. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास सोलापुरातील कोंड्याल शाळेजवळ हा सगळा थरार घडला. यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून, त्यामध्ये देशी बनावटीचे पिस्टल, चोरीसाठीचे साहित्य देखील जप्त केले आहे.
चार दिवसांपूर्वी सोलापुरातील बालाजी ज्वेलर्स हे सराफ दुकान फोडून चोरट्यांनी चार किलो चांदी आणि तीन तोळे सोने असा ऐवज चोरून नेला होता. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिस चोरट्याच्या मागावर होते. याच घटनेतील चोरट्यांनी चोरीची कार अविनाश नगरजवळील कोंड्याल शाळेजवळच्या निर्मनुष्य ठिकाणी उभी केली असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी त्या ठिकाणच्या तीन मजली इमारतीच्या बाजूने सापळा लावला.
शर्थीचे प्रयत्न करूनही चोरटे पसार
साधारण मध्यरात्री दीड- दोनच्या सुमारास तीन चोरटे दुचाकीवरुन कारजवळ आले.पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला तेव्हा त्यातील दुचाकीवरील एकाने पोलिस अंमलदार कट मारला. तर दुसरा एक चोरटा कार भरधाव वेगाने निघून पळून जाऊ लागला. या प्रकारानंतर तिथे उपस्थित फौजदार विक्रम रजपूत यांनी जोरात ओरडून कार थांबवण्यास सांगितले, परंतु चालकाने कार न थांबवता तशीच पुढे नेली. त्यावेळी कारच्या दिशेने फौजदार रजपूत यांनी दोन वेळा गोळीबार केला. त्यातील एक गोळी कारच्या मागच्या चाकात अडकली, तर दुसरीचा हवेत बार झाला. मात्र पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करूनही चोरटे पसार झाले. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.