सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारला. एकाच रात्रीत मोहोळ तालुक्यातील तीन एटीएम फोडण्याचे प्रयत्न चोरट्यांनी केले. यातील एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांचा फसले तरी दोन एटीएम फोडून तब्बल 49 लाख 27 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. या सर्व घटनांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 


मोहोळमधील कुरुल रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच कुरुलमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी 49 लाख 27 हजार 500 रुपये चोरुन नेले. तर पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने फसला. काल बुधवारी पहाटे हा प्रकार घडला. 


बुधवारी पहाटे 2.56 च्या सुमारास मोहोळ-मंद्रूप महामार्गावरील कुरुल रस्त्यालगतचे भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून 26 लाख 28 हजार 500 रुपये चोरुन नेले. यामध्ये मशीनचे साधारण दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर कुरुल येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी 22 लाख 99 हजाराची रोकड लंपास केली. बुधवारी पहाटे 3 वाजून 22 मिनिटांनी ही घटना घडली.


या घटनेतील चोरीची पद्धत पाहता हे सर्व एटीएम एकाच टोळीने फोडले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंगावर जॅकेट घालून आलेल्या या चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करताच आधी सीसीटीव्ही कॅमेरावर हिरव्या रंगाचा स्प्रे मारला आहे. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरावर रंग मारण्यात आल्याने चोरीची पूर्ण दृश्य कॅमेरात कैद होऊ शकलेले नाहीत. चोरीच्या वेळा पाहता एकानंतर एक असे तीनही एटीएम एकाच टोळीने फोडल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.


दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कुरुल येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरला भेट देऊन तेथील पोलीस अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या. मोहोळ आणि कुरुल या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना बोलावून पाहणी केली.