सोलापूर : अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारातील खंबीर नेतृत्व अशी सिद्रामप्पा पाटील यांची ओळख होती.
गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह राजकीय सामाजिक अन सहकार क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अक्कलकोट तालुक्यातील कुमठे इथं शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गावच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग ३५ वर्षे संचालक एकवेळ उपाध्यक्ष तसंच श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती, तालुक्याचे आमदार असा सिद्रामप्पा पाटील यांचा राजकीय प्रवास राहिला.