सोलापूर : अक्कलकोटचे माजी आमदार आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये त्यांनी हा प्रवेश केला. मध्यप्रदेशच्या लोकांनीही आपल्याला शिंदेंसाहेबांसोबत जा असं सांगितलं, त्यामुळेच शिवसेनेत जाण्याचं निश्चित केल्याचं सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितलं. तसेच तू भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी असल्याचं शिंदे आपल्याला म्हणाले असंही त्यांनी सांगितलं.
जिल्हात आमचे एकमेव घराणे आहे ज्याने कधीच पक्ष बदलला नव्हता. ही स्वामींची नगरी, स्वामी देखील म्हणतात, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच मला एकनाथ शिंदे म्हणाले, भिऊ नको तुझ्या पाठीशी आहे. दिलेला शब्द पाळणारा हा आमचा नेता, त्यामुळे मी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला असं सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले.
Siddharam Mhetre : उज्जैन महाकालच्या लोकांचाही शिंदेंसोबत जाण्याचा सल्ला
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मुलाचा कार्यक्रम होता. पण ते सोडून साहेब आमच्यासाठी आलेत. 1957 पासून आम्ही काँग्रेस सोबत होतो. विधानसभा निवडणुकीत मला एक लाख लोकांनी मतदान केलं. त्यानंतर मी राज्यभर चौकशी केली, मध्य प्रदेशच्या लोकांनीही मला शिंदेंसोबत जायला सांगितलं. उज्जैन महाकालेश्वरला आमचे लोक गेले होते. तिथं त्यांनी अनेकांना विचारलं. तेव्हा त्यांनाही सांगितलं गेलं की शिंदेसाहेबांसोबत जा.
सकाळी 11 पासून इथं लोकं बसलेत. पण तुम्ही अजून दोन तास जरी उशीर झाला असता तरी आम्ही असेल बसलो असतो असं एकनाथ शिंदे यांना उद्देशून सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले. ते म्हणाले की, "अनेकांची इच्छा होती की एकनाथ शिंदे या कार्यक्रमला येऊ नयेत. हा कार्यक्रम होऊ नये. आम्ही कधीच कोणाचे वाईट चिंतत नाही. मागच्या 40 वर्षात कधीच लोकांना पैसे देऊन आणले नाही. पैसे दिले की दोन तासात लोक उठून जातात. पण तुम्ही दहा तासांपासून इथे बसून आहात. मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो."
Siddharam Mhetre Join Shiv Sena : अक्कलकोटच्या विकासासाठी निधी द्या
सिद्धाराम म्हेत्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे अक्कलकोटच्या विकासासाठी मदत करावी अशी मागणी केली. ते म्हणाले की, "अक्कलकोट तालुका कर्नाटक सीमेवर असलेला तालुका, अनेकांची बोलीभाषा कन्नड आहे. पण या ठिकाणचे सिंचन योजनेचे काम निधी अभावी थांबलेलं आहे. तेवढा निधी आम्हाला द्यावी ही विनंती. अक्कलकोट नगरपालिका क वर्गातील आहे. त्यामुळे नगरपालिकेला 100 कोटी रुपये देण्यात यावेत. उजनी प्रमाणे कुरनूर धरणावर पर्यटन व्हावे ही आमची मागणी आहे. अक्कलकोटला एमआयडीसी मंजूर व्हावी ही विनंती आहे. बोरमणी विमानतळ दहा वर्षांपूर्वी मंजूर झालं आहे. पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात."