Sharad Pawar In Solapur Rain : शरद पवारांनी शब्द दिला आणि तो पाळला नाही असं कधीच झालं नाही, मग परिस्थिती कोणतीही असो. असाच एक प्रसंग सोलापुरात घडला आणि त्याची प्रचीती आली. शरद पवारांनी सोलापुरातील आपल्या सहकाऱ्याच्या दिलेला शब्द पाळला आणि त्याच्या भर पावसात त्याच्या नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहिले. शरद पवारांच्या या कृतीची सर्वत्र चर्चा केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वधूवराला आशीर्वाद देण्यासाठी भर पावसात लग्न सोहळ्याला हजेरी लावली. सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाला. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र भर पावसात शरद पवार यांचे आगमन झाले.
यावेळी नव वरवधूला आशीर्वाद देण्यासाठी शरद पवार स्वतः गाडीतून उतरून खाली आले आणि दोघांना शुभेच्छा दिल्या. खरं तर रविवारी सकाळपासून शरद पवार हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. सुरुवातीला पंढरपूर त्यानंतर सांगोला येथे कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवार यांना या लग्न सोहळ्याला यायला काहीसा उशीर झाला. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने शरद पवार येतील की नाही अशी शंका होती. मात्र आपल्या सहकार्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी शरद पवार यांनी भर पावसात देखील या सोहळ्याला हजेरी लावली.
Sharad Pawar In Satara Rain : शरद पवार आणि पाऊस
आपल्या सहकाऱ्याला दिलेला शब्द पाळणे हे शरद पवारांचे वैशिष्ट. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी सातारा मतदारसंघातून शरद पवारांचे मित्र श्रीनिवास पाटील यांनी फॉर्म भरला होता. उदयनराजे यांच्याविरोधात त्यांनी फॉर्म भरला होता. त्या वेळी देशात आणि महाराष्ट्रातही नरेंद्र मोदी आणि भाजपचं वारं होतं. राष्ट्रवादी संपल्यात जमा आहे, त्यांचे सर्व उमेदवार पडतील अशी चर्चा होती.
दरम्यान शरद पवार साताऱ्यात असताना, श्रीनिवास पाटील यांच्या प्रचाराच्या भाषणावेळी धोधो पाऊस पडायला सुरुवात झाली. त्यावेळीही शरद पवारांनी पावसाचा विचार न करता, आपल्या मित्रासाठी चक्क पावसात भाषण केलं आणि सभा गाजवली. शरद पवारांचा पावसातील फोटो आणि व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. एका क्षणात ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आणि शरद पवारांचे फोटो अनेकांच्य व्हॉट्सअॅप स्टेटसवर झळकले. त्याचा परिणाम असा झाला की उदयनराजेंना मोठ्या मताधिक्याने पराभव स्वीकारावा लागला आणि श्रीनिवास पाटील खासदार झाले.