Sangola News : राज्यातील शिंदे गटाचे स्टार आमदार म्हणून सांगोल्याचे (Sangola) शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गुवाहाटीमधील काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या डायलॉगची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर शहाजीबापू पाटील राज्यभर चर्चेत आले होते. दरम्यान, आता शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघातील विविध प्रश्न समोर येत आहेत. तालुक्यातील दक्षिण भागात असलेल्या जुजारपूर येथील ओढ्याला दर पावसाळ्यात भरपूर पाणी येते. यावर्षी देखील ओढ्याला पूर आला आहे. अशा पाण्यातूनच ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे.
पावसाळ्यात कायम या पुलावरून पाणी वाहते
सांगोला तालुक्यात दक्षिण भागात असलेल्या जुजारपूर येथील ओढ्याला दर पावसाळ्यात भरपूर पाणी येते. पाणी वाहत असल्यानं येथील शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना या पाण्यातूनच धोकादायक रीतीने प्रवास करण्याची वेळ आली आहे. या ओढ्यावर सध्याचा असणारा पूल जमीन पातळीलगत असल्याने पावसाळ्यात कायम या पुलावरून पाणी वाहत असते. यामुळे जुजारपूर-जुनोनी या रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागते. याशिवाय दुसऱ्या बाजूला असणाऱ्या पाटील वस्ती इथे जाणाऱ्या मार्गावर पुलचं नसल्यानं येथील प्रवास तर जीवघेणा ठरत आहे. या ठिकाणी उंच पूल बांधल्यास पावसाळ्याच्या चार महिन्यात या ग्रामस्थांची होणारी अडचण कायमची दूर होणार आहे. मात्र, याबाबत शहाजीबापूंना पाहायला वेळ नसल्याची टीका शिवसेनेचे नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
मतदारांच्या प्रश्नाबाबत बापू लक्ष देण्यास तयार नाहीत, लक्ष्मण हाकेंची टीका
विशेष म्हणजे जुजारपूर हे गाव शहाजीबापू पाटील यांच्या मागे कायम खंबीरपणे उभे राहिल्याचे दरवेळी मतदानातून दिसत असते. मात्र, आपल्याच मतदारांच्या प्रश्नाबाबत बापू लक्ष देण्यास तयार नसल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. सध्याही शाळकरी मुलं आणि ग्रामस्थांना या पाण्यातून जीवघेणा प्रवास करायला लागत असल्याचे हाके म्हणाले. त्यामुळं शहाजीबापूंनी भाषणबाजी करण्यापेक्षा मतदारसंघातील प्रस्नाकडे लक्ष घालावं अशी टीका आता विरोधक करत आहेत.
शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. शहाजी पाटील यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडला होता. शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाला साथ देत आधी सुरत आणि त्यानंतर गुवाहटी गाठली होती. त्यानंतर काळजीपोटी एका कार्यकर्त्यानं शहाजी पाटील यांना फोन लावला होता. त्यानंतर शहाजीबापूंनी गुवाहटीचं जे वर्णन केलं ते चांगलचं व्हायरलं झालं होतं.
महत्त्वाच्या बातम्या: