Shahaji Bapu Patil On Karnataka Issue: कर्नाटकमध्ये निवडणूक जवळ आल्या की कन्नडिगांची मते मिळविण्यासाठी महाराष्ट्रद्वेषी वक्तव्ये करण्याची जुनी पद्धत असून गुंडूराव मुख्यमंत्री असल्यापासून हे चालत आलेले आहे. घटनेनुसार आपण देशात कोठेही आणि कधीही फिरू शकतो त्यामुळे कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला किंमत देण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यास आपण केव्हाही कर्नाटक मध्ये जाण्यास तयार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.  कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे शिंदे गटानं मात्र एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या सीमेलगत असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद पुन्हा उफाळला आहे. त्यातच हा वाद सुरू असल्यामुळे परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये असा इशारा काल बोम्मई यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी सोलापुरात कर्नाटक भवन उभारणार असल्याची घोषणा केली आहे.   यावर बोलताना आज शहाजी बापू पाटील यांनी भाष्य केलं आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर लगेच कर्नाटकात जाण्यास तयार आहोत, असंही ते म्हणाले. 


शहाजीबापूंचा दिव्यांगांशी संवाद


आज एक संवाद दिव्यांगांशी हा कार्यक्रम शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथे आयोजित केला होता. यासाठी शेकडोच्या संख्येने दिव्यांग कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना शहाजीबापू यांनी आता दिव्यांगांसाठी कायम वेगळी यंत्रणा उभी करून त्यांना तालुक्यात न्याय देणार असल्याचे सांगत तुमचे जे दिव्यांग आहे, त्याला शहाजीबापू नाव ठेवा असा विश्वास दिला. तुम्ही शरीराने दिव्यांग आणि मी राजकारणात 20 वर्षे दिव्यांग होतो अशी मिश्किली करत आपण कायम या दिव्यांग बांधवांसाठी खंबीरपणे मागे उभे राहणार असल्याचे सांगितले. 


दिव्यांगांसाठी एक खास पतसंस्था उभी करणार असून त्यांना यातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद मिळेल असे सांगत केंद्र आणि राज्याच्या सर्व योजना या बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी आता काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आलेल्या दिव्यांगांना शासकीय प्रमाणपत्रांचे वाटप करून त्यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. यानंतर शहाजीबापू यांनी या दिव्यांगांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. आज सांगोल्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दिव्यांगांनी शहाजीबापू पाटील यांना आपल्या व्यथा सांगितल्या. 


ही बातमी देखील वाचा


सोलापुरातील कर्नाटक भवनसाठी दहा कोटी रूपये मंजूर; आठ महिन्यापूर्वीपासूनच सुरू होते प्लॅनिंग