सोलापूर: पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेनंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका को-ऑपरेटिव्ह बॅंकेला आरबीआयने दणका दिला आहे. आरबीआयने सोलापुरातील द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. वरील निर्बंध तीन महिन्यांसाठी वाढवले आहेत. 12 नोव्हेंबर 2021 रोजी द लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बॅंकेवर आर्थिक स्थितत ठिक नसल्यानं कारवाई करण्यात आली होती. 


सुरुवातीला बॅंकिंग रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत कलम 35 आणि कलम 56 अंतर्गत या बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 10 मे 2022 रोजी या निर्णयाचा रिव्ह्यू करत बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं तीन महिन्यांनी निर्बंध वाढवले होते. अशात पुन्हा एकदा ऑगस्टमध्ये लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बॅंकेकडून बॅंकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आणि बॅंकिंग व्यवहार सुदृढ न केल्याने 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत निर्बंध वाढवले आहेत. 


बॅंकेची स्थिती सुधारल्यास निर्बंध हटवले जातील. बॅंकेवर निर्बंध आहे पण परवाना रद्द करण्यात आला नाही. त्यामुळे बॅंक बॅंकिंग व्यवसाय आरबीआयनं घातलेल्या निर्बंधांसह करु शकते. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय कर्ज, कर्जाचे नुतनीकरण, गुंतवणूक, निधी उधार घेणे, नवीन ठेवी स्विकारणे किंवा कोणतेही मालमत्ता स्वीकारणे किंवा त्याची विक्री करणे, हस्तांतरण किंवा विल्हेवाट लावण्यावर बॅंकेला बॅंकिंग ॲक्टच्या कलम 35 अ अंतर्गत निर्बंध घालण्यात आलं आहे. 


पुण्यातील रुपी को ऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई
भारतीय रिझर्व्ह बँकेने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा (Rupee Cooperative Bank) परवाना रद्द केला आहे. बँकिंग नियमांचे पालन करण्यात रुपी बँक अपयशी ठरल्याचा ठपका आरबीआयने ठेवला असून रुपी बँकेला 22 सप्टेंबर 2022 पासून बँकिंग कामकाज बंद करण्याचा आदेश दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आरबीआयने ही कारवाई केली आहे. 


रुपी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही असं आरबीआयने आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे. बॅंकिंग नियमांचे पालन करण्यात बॅंक अपयशी ठरली असून बॅंक आपल्या ठेवीदारांसाठी व्यवहार सुरु ठेवण्यास प्रतिकूल नाही असंही आरबीआने म्हटलं आहे. सध्याची परिस्थिती पाहता बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत देऊ शकणार नाही असं आरबीआयने म्हटलं आहे.