Ranjitsinh Mohite Patil and Dhairyasheel Mohite Patil, Solapur : सोलापूर-गोवा विमानसेवा शुभारंभच्या कार्यक्रमातून माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आणि भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी काढता पाय घेतलाय. दोन्ही मोहिते पाटील बंधू अचानक निघून गेल्याने सोलापुरात चर्चेला उधाण आलंय.
भाजपने निमंत्रण पत्रिकेतून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव वगळले होते. मात्र, तरी देखील सोलापूर-गोवा विमानसेवा शुभारंभ कार्यक्रमास आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे उपस्थित होते. मात्र व्यासपीठावर येऊन बसल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच मोहिते - पाटील बंधू मंचवरून निघून गेले आहेत.
जयकुमार गोरेंनी मोहिते पाटील बंधूंचा उल्लेख टाळला
सोलापूर - गोवा विमासेवा लोकार्पण सोहळ्याच्या भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतून या अगोदरच आमदार रणजितसिंह मोहिते - पाटील यांच नाव वगळण्यात आले होते. मात्र कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच मोहिते - पाटील बंधू हे अचानक भर निघून गेल्याने सोलापुरात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील दोघाचा नामोल्लेख टाळलेला पाहायला मिळाला.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं काम केलं, असा आरोप त्यांच्यावर वारंवार करण्यात आलाय. ते या निवडणुकीदरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ देताना देखील पाहायला मिळाले होते. माळशीरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी यापूर्वीही रणजितसिंह मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केले होते. मात्र, भाजपने आत्तापर्यंत त्यांच्यावर कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोहिते पाटलांवरच्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी बावनकुळे हा वरिष्ठ पातळीवरील मुद्दा असल्याचं म्हणाले होते. वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन कारवाई केल जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
1948 साली सोलापूर शहरातील होटगी रोड परिसरात विमानतळाची उभारणी करण्यात आली.स्वातंत्र्यानंतर हैद्राबाद विलिनिकरणासाठी ‘ऑपरेशन निजाम’ राबवण्यात आले. त्यासाठी संरक्षण दलाने सोलापूरात हे विमानतळ उभारले. ऑपरेशन निजाम फत्ते झाल्यानंतर या विमानतळकडे दुर्लक्ष झालं. 1978 पुन्हा या विमानतळाची उभारणी करण्यात आली. 1996 साली वायुदूत कंपनीच्या माध्यमातून विमानसेवा सुरु झाली. प्रतिसादअभावी ही विमानसेवा बंद पडली. 2009 साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा नागरी विमानसेवा सुरु झाली.2010 साली किंगफिशर कंपनी डबगाईला आल्याने ही विमानसेवा बंद पडली. 2024 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे ऑनलाईन पद्धतीने उदघाट्न झाले. त्यानंतर आज या विमतळावरून नागरी विमानसेवा सुरु होतं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या