पंढरपूर: माऊली कॉरिडॉरचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला असल्याचं चित्र आहे. आज सकाळी अचानक मंदिर परिसर, शिवाजी चौक, महाद्वार घाट अशा महत्वाच्या ठिकाणी सशस्त्र शीघ्र कृती दलाच्या बटालियनने संचलन केल्याने व्यापारी आणि बाधित नागरिकात नाराजी निर्माण झाली. हा दबाव तंत्र आणि दहशतीचा भाग असून याला आम्ही घाबरणार नाही अशी भूमिका आता आंदोलकांनी घेतली आहे. पंढरपूर विकास आराखडा आणि माऊली कॉरिडॉर राबविण्याच्या तयारीत सध्या शासन असून बाधित व्यापारी आणि नागरिकांना मात्र चर्चेत अजूनही झुलवत ठेवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप करण्यात येतोय यामुळे हे आंदोलन देखील दिवसेंदिवस तीव्र होत चालले असताना आज अचानक मंदिर परिसरात 63 सशस्त्र कमांडो असलेल्या बटालियनने संचलन केल्याने वातावरण गढूळ बनले आहे. 
   

  
आजच्या संचलनानंतर पंढरपुरातील व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही काही अतिरेकी नाहीत, आम्हाला घाबरावयाला रॅपिड अॅक्शन फोर्स आणण्यात आलं, मात्र आमची घरे-दारे जाणार असतील तर आम्ही गोळ्याही खाऊ मात्र कॉरिडॉर रद्द केल्याशिवाय आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. पंढरपूर हे संतांचे माहेरघर असून खुद्द छत्रपतींकडून या देवस्थानाला बिदागी आणि रक्षणाची जबाबदारी घेतल्याचा इतिहास आहे, असे कमांडो फिरवून आम्ही घाबरणार नसल्याच्या प्रतिक्रिया महिला आंदोलकांनी दिल्या. 


दरम्यान, आज झालेले संचलन हे नियमित कामकाजाचा भाग असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. दर दोन वर्षानंतर महत्त्वाची तीर्थक्षेत्रं, त्याचा परिसर याचा अभ्यास रॅपिड अॅक्शन फोर्स करत असतो. दंगलीच्या वेळी अथवा गर्दीच्या वेळी गर्दी नियंत्रणासाठी अशा ठिकाणांची सर्व माहिती आवश्यक असल्याने आम्ही आज मंदिर परिसराची पाहणी करून संचलन केल्याचे या बटालियनचे श्रेयस पवार यांनी सांगितले. 


पोलिसांकडून अशी प्रतिक्रिया आली असली तरी या सर्वाच्या मागे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप व्यापारी आणि नागरिकांनी केला आहे. तसेच हा सर्व प्रकार घडल्याने व्यापारी आणि नागरिक वर्गात याच्या विरोधात संतापाचे वातावरण तयार झाले आहे . 


माऊली कॉरिडॉरमध्ये सध्या 40 फूट असणारा रस्ता 360 फूट करण्याचा प्रस्ताव असल्याने या मार्गावरील 600 नागरिक आणि 146 दुकाने बाधित होणार आहेत. यातील बहुतांश दुकाने आणि घरे पूर्णपणे पडणार असल्याने पिढ्यानपिढ्या मंदिर परिसरात व्यापार करणारे आणि निवास करणाऱ्या शेकडो नागरिकांना एका रात्रीतून विस्थापित होण्याची वेळ येणार आहे.