Maharashtra Pandharpur News: पंढरपूर : यंदाच्या वर्षात दुष्काळाचं (Drought) संकट अवघ्या महाराष्ट्रासमोर (Maharashtra News) आ वासून उभं राहण्याची शक्यता आहे. यावर्षी दुष्काळाची दाहकता जास्त प्रमाणात जाणवणार असून आजपासून पंढरपूर (Pandharpur News) शहरात एकदिवसाआड पाणीपुरवठा (Water Supply) केला जाणार आहे. पंढरपुरात दाखल होणारे भाविक आणि पंढरपूरकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार आहे. 


यंदा पाऊस (Maharashtra Rains) कमी झाल्यानं उजनी धरणात (Ujjani Dam) आताच वजा 4 टक्के पाणीसाठा उरला आहे. यातच जुलै महिन्यापर्यंत धरणातील पाणी काटकसरीनं वापरावं लागणार असल्यानं पंढरपूर नगरपालिकेनं (Pandharpur Municipality) आजपासून शहरात पाणीकपात (Water Cut) सुरू केली आहे. नागरिकांना आता एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचा फटका शहरातील नागरिकांसोबत रोज येणाऱ्या हजारो भाविकांना देखील बसणार आहे. 


पंढरपूर शहराची गरज रोज 34 एमएलटी पाण्याची असून आता पाणीकपातीमुळे 18 ते 20 एमएलटी एवढंच पाणी लागणार आहे. ज्यामुळे शिल्लक पाणी अजून 50 ते 60 दिवसांपर्यंत पुरवता येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली आहे. पंढरपूर प्रांताधिकारी, जलसिंचन विभाग आणि नगरपालिकेच्या झालेल्या बैठकीत पाण्याचं नियोजन करताना आजपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी दिली आहे. याचा फटका गोरगरीब नागरिकांना बसणार आहे. तसेच, आता त्यांना पाणी साठवण्यासाठी जादाची भांडी किंवा साधनं घ्यावी लागणार आहेत. याचपद्धतीनं रोज हजारोंच्या संख्येनं येणाऱ्या भाविकांना देखील कशारितीनं पाणी देणार, असा सवाल माजी नगरसेवक विक्रम पापरकर यांनी केला आहे. 


दरम्यान, अजून जानेवारी महिना संपलेला नाही. त्यापूर्वीच पंढरपूरकरांना दुष्काळ्याच्या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दुष्काळाचे चटके बसू लागल्यानं यंदाचा उन्हाळा फार त्रासदायक जाणार असल्याचं भीषण सत्य यानिमित्तानं समोर आलं आहे.