Pandharpur News : महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपूर (Pandharpur) शहरात रस्त्यांची (Roads) दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. अनेक मुख्य रस्त्यांची चाळण झाल्यानं वाहनचालकांसह भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरामधील स्टेशन रोड, सरगम चौक, कॉलेज रस्ता, बस स्थानक या प्रमुख ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत. त्यामुळं वाहतूकीवर परिणाम होत आहे. या परिसरात धीम्या गतीनं वाहतूक सुरु आहे. 

वाहन चालकांसह भाविकांना त्रास 

पंढरपूर शहरांमधील आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर नगरपालिकेला 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील सर्व रस्ते यात्रेदरम्यान दुरुस्त करुन घेण्याचे आदेश दिले होते. ते काम पूर्ण करून एक महिनाही झाला नसताना पंढरपुरात ठिकठिकाणी रस्ते उखडल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळं वाहन चालकांसह पंढरपूरमधील नागरिकांना आणि भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

नगरपालिका प्रशासनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह

आषाढी वारी होऊन अजून एक महिनाही झाले नाही. तोच पहिल्याच पावसात पंढरपूरमधील या नगरपालिकेने दुरुस्त केलेल्या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळं नगरपालिका प्रशासनावर या कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामाबद्दल पालिकेने ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Cabinet Decision: रस्ते वेगाने बांधण्यासाठी राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय