सोलापूर: राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरातील (Pandharpur ) कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi)  शासकीय महापूजेला बोलावण्यास विरोध झाल्यानंतर ही पूजा कुणाच्या हस्ते करावी असा पेच निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी विरोध करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांनी आता या महापूजेसाठी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) याना निमंत्रित करावे अशी मागणी केली आहे. अकलूज येथील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक आणि जरांगे यांच्या आवाहनानंतर 5 दिवस आमरण उपोषण करणारे गणेश इंगळे यांनी या मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पाठवले आहे. 


आषाढीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा नियम आहे. मात्र मराठा आरक्षण (Maratha Reservation) न मिळाल्याने पंढरपूर येथील सकल मराठा समाजाने यंदा कार्तिकी महापूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्री, मंत्री अथवा आमदाराला येऊ दिले जाणार नसल्याची घोषणा केली आहे. मंदिर समितीनेही मराठा समाजाच्या प्रक्षोभ शासनाला कळविला असून कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करण्याची मागणी माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाने केली आहे. 


मनोज जरांगे यांनी 15 नोव्हेंबर पासून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली असून त्यांचा हा दौरा 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. कार्तिकी एकादशी देखील 23 नोव्हेंबर रोजी असून मराठा समाजाच्या वतीने केल्या गेलेल्या या मागणीबद्दल आता जरांगे काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.


कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी रोखण्याचा निर्णय पंढरपूर येथील मराठा आंदोलकांनी घेतल्याबाबत देखील मनोज जरांगे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आता थेट त्यांच्याच हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली आहे. मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी आरक्षण वेळेवर द्यावेच, शिवाय समाजासाठी प्रामाणिकपणे लढणाऱ्या मनोज जरांगे याना महापूजेसाठी निमंत्रित करावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 


मंदिर समिती बैठकीत गोंधळ 


कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्यास यात्रा कालावधीत होणाऱ्या प्रकाराला शासन आणि मंदिर समिती जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी आज मंदिर समितीला दिला. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनामुळे 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीच्या पूजेला बंदी करून येऊ दिले नव्हते. तशीच वेळ पुन्हा येईल असा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला.


2018 ची पुनरावृत्ती घडेल 


मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिलेली असली तरी आम्ही पंढरपूरमध्ये मंत्री, आमदार, खासदार यांची बंदी उठवलेली नाही. आधी आरक्षण देऊन तुम्ही पूजेला आल्यास आम्ही फुले टाकून स्वागत करू, मात्र बळाचा वापर करून आल्यास आम्ही येऊ देणार नाही आणि होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आंदोलक किरणराज घाडगे आणि संदीप मांडवे यांनी दिला.


ही बातमी वाचा: