Ashadhi Wari 2020 : मानला तर देव नाही तर दगड या उक्तीप्रमाणे देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेमध्ये आहे. म्हणूनच अष्ट कलातील एक कला म्हणून शिल्पकलेची ओळख आहे. अतिशय प्राचीन काळापासून विठुरायाच्या या नगरीत ही कला जोपासली जाते आहे. म्हणूनच वर्षभर इथे बनवलेल्या शेकडो आकर्षक दगडी मूर्ती देशभर आणि अगदी सातासमुद्रापार जात असतात. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे कोणतीच यात्रा होऊ न शकल्याने हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. मात्र यंदा दोन वर्षानंतर होत असलेल्या आषाढी महासोहळ्यासाठी मागणीनुसार दगडी मूर्ती बनवण्यासाठी कारागीर सध्या रात्रंदिवस झटत आहेत. यात्रा काळात या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने यंदा आषाढीसाठी मोठ्या प्रमाणात या मूर्ती बनवून ठेवण्यात आल्या आहेत. विठुराया आणि विविध संतांच्या मूर्ती हे पंढरपूरचे खास वैशिष्ट्ये असते. म्हणूनच वाड्या वस्त्यापासून मोठमोठ्या शहरातील मंदिरात पंढरपुरात बनलेल्या दगडी मूर्ती विराजमान झालेल्या दिसतात. 


ओबडधोबड दगडातून आकर्षक, रेखीव, प्रसन्न भावमुद्रा तयार करण्याची कला म्हणजे ही शिल्पकला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही असं म्हणतात. म्हणूनच दगडातून साकारणाऱ्या परब्रह्म रुपाला देवपण येते जे जगभर पूजनीय ठरते. विठुरायाच्या पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल करणारा व्यवसाय म्हणजे मूर्तीकला. आषाढी आणि इतर यात्रा काळात देशभरातून येणारे भाविक विठ्ठल रुक्मिणी आणि विविध सनातनच्या मूर्ती येथून घेऊन जाऊन आपापल्या गावात, मंदिरात आणि घरात प्रतिष्ठापना करतात. आधीच्या यात्रेला येऊन आपल्याला हव्या त्या आकाराची मूर्ती तयार करायला सांगून पुढच्या यात्रेत ती घेऊन जायची वारकरी संप्रदायात प्रथा आहे. गाव तिथे विठुराया ही परिस्थिती महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पाहायला मिळते. विठुरायाचे लाखो भक्त आपल्या गावातील मंदिरात विठुरायाची स्थापना करुन उपासना करत असतात. याचबरोबर महाराष्ट्रात बऱ्याच गावात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळेच पंढरपूर परिसरातील 12 ते 15 कारखान्यात या दगडी मूर्ती बनवण्याचे काम बाराही महिने सुरु असते. मात्र येथील परदेशी आणि मंडवाले हे दोन कारखाने पिढ्यानपिढ्या येथे दगडी मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. पंढरपुरातील जुन्या कारखान्यांपैकी मंडवाले यांच्या कारखान्यात सध्या उच्चविद्या घेऊनही अक्षय हा सहाव्या पिढीचा तरुण मूर्तीकलेतच आपले करियर करत आहे. दहा हजार रुपयांपासून पाच लाखांपर्यंत विविध आकारात या दगडी मूर्ती बनवल्या जात असतात. 


यासाठी विशिष्ट प्रकारच्या दगडांची, बहुतांश मूर्ती या काळा पाषाण, शाळीग्राम दगडांपासून बनवल्या जातात. मात्र अलीकडच्या काळात संतांच्या मूर्ती या संगमरवरी दगडात बनवण्याची प्रथा सुरु झाली आहे. यासाठी लागणार काळा पाषाण, गंडकी पाषाण हा कर्नाटकमधील बागलकोट इथून आणण्यात येतो. मात्र विविध प्रकारच्या संगमरवर दगड मात्र राजस्थान इथून मागवले जातात. मूर्तींच्या आकारावरुन त्यांचे दर ठरले जातात. मुख्यतः विठूरायाची मूर्ती ही काळा किंवा गंडकी पाषाणातच बनवली जाते. कोणतीही मूर्ती बनवताना प्रथम दगडावर स्केचिंग करुन मगच कामाला सुरुवात होते. सुरुवातीला मूर्तीचा सांगाडा बनवून मग त्याला रेखीव आकार दिले जातात. एकदा मूर्ती तयार झाली की त्यावर फिनिशिंगसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. या मूर्तींना ग्रॅण्डरने मूळ दगडापासून कट करुन पॉलिश पेपरच्या साहाय्याने घासून सुबकपणा आणि अचूकता साधली जाते. मूर्तींच्या आकारावर त्याच्या किमती ठरतात. एक कारागीर दगडी मूर्ती बनवण्यासाठी १५ दिवस कष्ट करतो पण संगमरवरी मूर्तीला जादा वेळ लागतो. पंढरपूर येथील कारखान्यातून दरवर्षी अनेक मूर्ती अमेरिका आणि युरोपला जात असतात. यंदाही आषाढी यात्रेसाठी मागणीनुसार शेकडो मूर्ती सध्या बनवून तयार झाल्या असून भाविकही खरेदीसाठी सज्ज झाले आहेत.