Pandharpur News : माचणूर (Machnoor) इथलं पुरातन मंदिर अखेर गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2022) तिसऱ्या दिवशी उघडलं आणि आज गणेशाचं पूजन झालं. सोलापूरचे (Solapur) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या शिष्टाईला यश आलं आलं आणि पुरातन मंदिर उघडून गणेशाचं पूजन झालं. एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर भाविकांना मोठं यश मिळालं असून ग्रामस्थांनी एबीपी माझाचे आभार मानले.


तीन दिवसांपूर्वी गणेशाच्या आगमनाला पुरातत्व विभागाने नियमावर बोट ठेवत माचणूर येथील पुरातन मंदिरातील गणेश मूर्तीच्या मागील फरशींची तोडफोड केल्याचे कृष्णकृत्य एबीपी माझाने समोर आणलं. ग्रामस्थांच्या संतापला वाचा फोडल्यानंतर आता या गणेशभक्तांना न्याय मिळाला असून आज तिसऱ्या दिवशी मंदिरातील बाप्पाची विधिवत पूजा करण्यात आली.  सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या शिष्टाईला यश आलं असून आज तिसऱ्या दिवशी हे पुरातन मंदिर उघडलं. आता भाविकांना बाप्पाचे आणि शंभो महादेवाचे दर्शन घेता येणार आहे. आमच्या श्रद्धेच्या पाठीशी एबीपी माझा उभा राहिल्यानेच आम्हाला न्याय मिळाला, अशा शब्दात ग्रामस्थांकडून माझाचे आभार मानण्यात येत आहेत. 


माचणूर इथले महादेव मंदिर हे जवळपास पाच हजार वर्षांपूर्वीचे असून पुराणात या मंदिराचे अनेक दाखले मिळतात . हे मंदिर पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही याच्या जीर्णोद्धाराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. या मंदिरातील पुरातन गणेश मूर्तीच्या मागील फरशी निघू लागल्याने स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पुरातत्व विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र याकडे लक्ष देण्यास पुरातत्व खाते पुढे येत नसल्याने ग्रामस्थांनीच येथील फरशी बदलली. फरशी बदलल्याचे समजताच लगेच पुरातत्व विभागाने नियमावर बोट ठेवत बाप्पाच्या आगमनादिवशीच ही फरशी तोडून टाकल्याने ग्रामस्थ आणि भाविक संतप्त झाले. 


याचे वास्तव एबीपी माझाने दाखवत भाविकांच्या मागे उभे राहिल्याने प्रशासनाला याची दाखल घ्यावी लागली. ग्रामस्थांनी हे पुरातन मंदिर बंद ठेवत पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आंदोलन सुरु केले. काल (1 सप्टेंबर) दिवसभर जिल्ह्यातील अधिकारी आणि स्थानिक आमदार समाधान अवताडे यांनी या मंदिरात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली होती. अखेर आमदार अवताडे यांनी फोनवरुन या प्रकारचे गांभीर्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्यावर चक्रे फिरली. सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्रामस्थ आणि भाविकांशी चर्चा केली. या प्रकारच्या चौकशीसाठी समिती गठित करुन दोन दिवसात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार गणेश मूर्तीच्या मागे पुन्हा फरशी बसवण्याच्या सूचना पुरातत्व विभागाला दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 


देशभर घरोघरी बाप्पा आला असताना पुरातत्व विभागाच्या तोडफोडीमुळे या पुरातन मंदिराची पूजा तीन दिवसांपासून झालेली नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिष्टाईनंतर बाप्पाचे विधिवत पूजन करुन हलवलेला काशिनाथ महाराजांचा मुखवटा पुन्हा पुजाऱ्यांनी या ठिकाणी स्थापित केला. आज अखेर महादेव मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाजा उघडून शंभो महादेवाची पूजा करण्यात आली. एबीपी माझाकडून लाभलेल्या पाठबळामुळे हजारो गणेश भक्तांना न्याय मिळाल्याच्या भावना माचणूर येथील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी व्यक्त केल्या. 


Solapur : जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने सोलापूरच्या माचणूर वादावर तोडगा ABP Majha