सोलापूर : एक हजार कोटी रुपयाचे डिझेल खर्च करून 10  लाख वाहने आणि तीन कोटी गरीब समाजाला घेऊन मराठा आंदोलक (Maratha Reservation)  मुंबईत धडकणार  आहेत . आता मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासाठी 10 लाख गाड्या आणि तीन कोटी समाजाला सामावणारे मैदान मुंबईत द्यायचे आहे असा सणसणीत टोला आज ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shnendge)  यांनी लगावला.  पंढरपुरातील एल्गार मेळावा संपल्यावर शेंडगे यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले . यावेळी त्यांचे सोबत इतर ओबीसी नेते होते . यावेळी माझाशी बोलताना शेंडगे यांनी जोरदार टोलेबाजी केली. मनोज जरांगे  यांच्या सभेत 200  जेसीबी आणि एक हेलिकॉप्टर पुष्पवृष्टीला असतात.  हा अतिशय गरीब समाज असून यांच्यासारखी गरिबी आमच्या भटक्या समाजाला यावी असे विठ्ठलाला साकडे घातल्याचे सांगितले .
 
 मनोज जरंगे यांचा एक प्रतिनिधी मुंबईत माझ्या ऑफिसमध्ये वाद संपवण्याच्या दृष्टीने चर्चेला आले होते. आमची चर्चा करायची नेहमीच तयारी आहे मात्र मराठा मोर्चाची जी मागणी होती तिच मागणी मराठा समाज आरक्षणासाठी घेत असेल तर चर्चा होऊ शकते . या 58  मोर्चात दुसऱ्या कोणाच्याही आरक्षणात वाट न मागता आरक्षण देण्याची सकल मराठा मोर्चाची मागणी होती. या मागणीसाठी सकल ओबीसी समाज मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांच्या मागे उभा राहणार आहे . मात्र आता आमच्या  वाट्याचे आरक्षण हिसकावून घेण्याची भाषा सुरु असल्याने यातून सामंजस्य कसे होणार असा सवाल शेंडगे यांनी केला. मुंबईत 20 जानेवारी रोजी ओबीसी समाज हजारोच्या संख्येने जमा होणार असून आझाद मैदानासाठी आम्ही आधी अर्ज दिला आहे. आमच्यासोबत दोन हजार गाढवे , नंदी बैले , डुक्करे अशी आमची जनावरेही आमच्या सोबत मुंबईत येतील . याशिवाय राज्यातील प्रत्येक गावात हे आंदोलन होणार असून ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाही , मराठ्यांना दिलेल्या सर्व सवलती ओबीसी समाजाला द्याव्यात, आमच्या रिक्त जागा तातडीने भरून घ्याव्यात आणि जातनिहाय जनगणना करावी या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही असा निर्धार शेंडगे यांनी व्यक्त केला. 


आमची फसवणूक केली तर सरकारला ओबीसी समाज झटका देईल : प्रकाश शेंडगे


राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसात मराठा समाजाला मागास ठरविण्याच्या हालचाली सुरु केल्या असून  या साठी 380  कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जर एकट्या मराठा समाजाच्या पडताळणीसाठी इतका खर्च करीत असाल तर बिहारने 500 कोटीत संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जातीची जनगणना केली होती. आता जातनिहाय जनगणना करण्याची मागणी सगळेच पक्षाचे नेते करत असतील तर ती जनगणना करा हीच आमची मागणी आहे. सध्या रात्रीतून जीआर निघत आहेत , मागास  आयोग हायजॅक करून त्याला आता मराठा आयोग केला आहे . यातील सदस्यांना पंचतारांकित सोयी देऊ लागले आहेत . शासन आम्हाला ओबीसीमधून आरक्षण देणार नसल्याचे लेखी देते आणि दुसऱ्या बाजूने जरांगे सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेणार असे सांगत आहे . नेमके चालले काय आहे हेच समाजात नाही. मात्र आता ओबीसी समाज जागृत झाला असून आमची फसवणूक करून आम्हाला झटका देण्याचा प्रयत्न केल्यास सरकारलाही ओबीसी समाज झटका देईल असा इशारा शेंडगे यांनी दिला.  फसगत झाली तर न्यायालयात तर खेचूच शिवाय 2024 च्या रणसंग्रामात राज्यात ओबीसींचे सरकार असेल  असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी माझाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिला. 


हे ही वाचा :