OBC Reservation : पंढरपूर : अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत ओबीसी समाजाचा (OBC Samaj) महाएल्गार मेळावा (OBC Mahaelgar Melava) पार पडणार आहे. यावेळी छगन भुजबळ किंवा इतर नेत्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांना तुडवून काढा, असा इशारा स्थानिक ओबीसी नेत्यांनी दिला आहे. उद्या (6 जानेवारी 2024) रोजी शहरात मध्यवर्ती असणाऱ्या टिळक स्मारक पटांगण येथे दुपारी चार वाजता ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे. यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील गावोगावच्या ओबीसी समाजाला निमंत्रणं पोहोचली आहेत. पंढरपूरचा ओबीसी मेळावा विक्रमी होणार, असा दावा ओबीसी नेते माऊली हळणवर यांनी केला आहे. कोणी छगन भुजबळ किंवा गोपीनाथ पडळकर यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तुडवून काढू, असा इशारा माऊली हळणवर यांनी दिला आहे.


छगन भुजबळ यांनी पंढरपूर मेळाव्यात मनोज जरांगे यांच्यावर वेडीवाकडी वक्तव्य केल्यास त्यांना चपलेचा हार घालू, असा इशारा मराठा समाजाचे नेते रामभाऊ गायकवाड यांनी दिला होता. यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला असून येथे मराठा आणि ओबीसी समाज गुण्यागोविंदानं नांदत असताना रामभाऊ गायकवाड दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या मागे मराठा समाजही नसून जर त्यांनी भुजबळ अथवा कोणत्या नेत्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तुडवून काढणार, असा इशारा ओबीसी नेते माऊली हळणवर यांनी दिला आहे. 


प्रस्थापितांना टक्कर ओबीसी शंभरात 70 आहोत, याची जाणीव ठेवावी, असा इशाराही माऊली हळणवर यांनी दिला आहे. राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असून कायदेशीर दृष्ट्या सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळणं अशक्य आहे. मात्र, शासन राजकीय फायद्यासाठी मराठ्यांची दिशाभूल करत असून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही, असं ओबीसी नेते भारत माळी यांनी सांगितलं आहे. 


एकंदरीत उद्या होणाऱ्या महाएल्गार मेळाव्याचे संयोजक आमदार गोपीचंद पडळकर असून ते उद्या ओबीसी महामेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. टिळक स्मारक मंदिर पटांगणावर बारा महिने असणारे सर्व फेरीवाले, भेळवाले यांचे गाडे येथून हलविण्यात आल्यानं आता मैदानाची भव्यता दिसू लागली आहे. या मैदानात आता ओबीसी मधील लहान मोठ्या जातींच्या नेत्यांची डिजिटल फलक लागण्यास सुरुवात झाली आहे. काही महिन्यापूर्वी याच मैदानाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे यांची सभा झाली होती. आता त्याच भागात ओबीसी महाएल्गार मेळावा घेण्यात येत आहे.