सोलापूर: मी कुणाचा माणूस आहे यावर कुणाला कुणाचा मेळ लागेना, मी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा माणूस आहे आणि माझा मालक मराठा समाज आहे असं सांगत मनोज जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं.  विधानसभेची निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय 29 तारखेला होईल, एकतर उमेदवार उभा करायचे किंवा पाडापाडी करायचे असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं. मनोज जरांगे याचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू झाला असून ते सोलापुरातील शांतता रॅलीत बोलत होते. 


प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, आधी ते म्हणाले की देवेंद्र फडणवीसांसोबत सुरू असलेले भांडण हे नकली आहे. त्यानंतर लगेच नांदेडमध्ये म्हणाले की मी शरद पवारांचा माणूस आहे. त्यांचं त्यांनाच मेळ लागेना मी कुणाचा माणूस आहे ते. मी कुणाचा हे कोडे त्यांना उलगडूच शकत नाही, कारण तोवर ते पडलेले असतील. मी फक्त मराठा समाजाचा आहे, माझा मालक फक्त मराठा समाज आहे. बाकी कुणाला गणतीत धरत नाही. 


शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा आरक्षणासाठी लढणार असा शब्द मी मराठा समाजाला दिला असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मी फुटत नाही म्हणून सरकार लावालावीचं काम करतंय असा आरोपही त्यांनी केला. 


येत्या 29 तारखेला अंतरवालीत या असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. ते म्हणाले की, मराठ्यांनी 100 टक्के मतदान करायचं.  एकदा का उमेदवार उभा केला तर त्याच्या मागे उभा राहायचं. उमेदवार उभे  करायचे ठरले नाही, निवडणूक लढायची ठरली नाही तर मग पाडापाडी करायचं.


मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं काम सुरू


सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही, नुसता लावालावी करतंय असा आरोप करत मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचे समन्वय फोडण्यासाठी सरकारचे रणनीती सुरू झाली. स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकजण पुढे आले. देवेंद्र फडणवीसांचे ऐकून अभियान सुरू झालं आहे. मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष कालवू नका. मराठ्यांच्या नजरेला नजर मिळवायची आहे, गद्दाराचा शिक्का लाऊ देऊ नका. एका क्रांती मोर्चाचे तीन मोर्चे केले. चांगले समन्वयकांना बदनाम करण्याचं काम सुरू केलंय. तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण समाजाच्या लेकराच्या भविष्याच्या आड नका येऊ. 


तुम्हाला काही आमिष दाखवलं असेल, काही पद दिली असतील तर त्यासाठी मराठा समाजाच्या मुलांचं भविष्य नासवू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. 


ही बातमी वाचा: