Manoj Jarange: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आणि अन्य काही मागण्यांसाठी लढा उभारलेले मनोज जरांगे यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यासाठी ते राज्यभरात दौरे, शांतता रॅली करत आहेत. काल सोलापूरात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळांना लक्ष्य केलं आहे. 


सोलापूरातील शांतता रॅलीमध्ये बोलताना मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना आता सुटी देणार नाही. छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल त्या पक्षाचा कार्यक्रम लावायचा. देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन माढा तालुक्यातील कार्यक्रमाला आले होते. यापुढील काळात घेऊन फिरले तर त्या मतदारसंघातील उमेदवारही पाडा, असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी केलं आहे.


राज्यातीस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी शांतता रॅली बुधवारी सोलापूर शहरात होती. काल बुधवारी, छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, राजकीय नेत्यांनी मराठ्यांच्या पोरां-बाळांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असं ठरवले आहे. कारण, त्यांची पत्रकं चिटकवायला, प्रचार करायला मराठ्यांची पोरं पाहिजेत. हे सरकार आरक्षण देण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. ते फक्त लावालाव्या करताना दिसत आहे. माझ्याविरुद्ध अनेक जणांना उठवून बसवले आहे. मराठ्यांचे समन्वयक फोडायला सुरुवात झाली आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


आम्ही याआधी तुम्हाला काही मागितलं आहे, माझ्या समाजाला आरक्षण मिळावं इतकंच आहे. आमच्या लेकरांच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, गेल्या एका वर्षापासून आम्ही लढतोय. आम्ही तुम्हाला काही म्हणालो नाही, मात्र तुम्ही माझ्या समाजाला टार्गेट केलं, पण इतकं लक्षात ठेवा यांना मराठे म्हणातात, यांच्या नादी लागला तर तुमचा राजकीय सुफडा साफ होईल असंही मनोज जरांगेंनी यावेळी म्हटलं आहे. 


काय म्हणाले मनोज जरांगे?


शिवछत्रपती चौकात झालेल्या मराठा बांधवांच्या सभेत जरांगे-पाटील (Manoj Jarange)  म्हणाले की, छगन भुजबळ पंधरा दिवस झाले दिसेनात कुठं. अरे आता एक गोष्ट घडली तुमच्याकडं. सोलापूर जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला. त्याला देवेंद्र फडणवीस आले होते. कुठं झाला कार्यक्रम त्यावेळी गर्दीतून आवाज आला माढा, त्यावेळी जरांगे पाटील यांनी घोषण केली की, छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेउन जाईल त्याचा उमेदवार पाडायचा.