Prakash Ambedkar: राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक पक्षांचे मोठे नेते राज्यात सभा घेत आहेत, सर्वत्र प्रचाराचा धुराळा उडत असल्याचं चित्र आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची आज पहिलीच सभा सोलापुरात पार पडणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती सुधारल्याने ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिसून येत आहे. 


सोलापुरात आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा होणार आहे. काही दिवसांपुर्वी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांनतर आता त्यांची ही पहिलीच सभा पार पडणार आहे. रुग्णालयात असताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काळजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं होतं.


ओबीसी आरक्षण, आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमीलेयर, आदिवासींचे प्रश्न, मुस्लीम, भटके विमुक्त यांचे प्रश्न या संदर्भात वंचित बहुजन आघाडी वारंवार स्पष्ट भूमिका घेत आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एससी, एसटी, ओबीसी, मुस्लीम हे मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळत असल्याचे चित्र आहे. आता प्रकाश आंबेडकर सोलापुरात काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.






अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अजित पवारांनी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस केली, त्याचबरोबर ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपुर्वी (गुरुवारी 31 ऑक्टोबरच्या) पहाटे त्यांना छातीत दुखू लागल्याने पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल( शुक्रवारी) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. एकनाथ शिंदेंनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर बरं होऊन जनसेवेत रुजू होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्या भेटीबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "इथे जवळच सभा होती आणि प्रकाश आंबेडकरांचं नुकतच ऑपरेशन झालं होतं म्हणून भेटायला आलो होतो. याचा कुठलाही राजकीय अर्थ काढू नका, ते माझे चांगले मित्र आहेत," असंही शिंदेंनी म्हटलं आहे.