पंढरपूर:  उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे विद्यमान तालुकाप्रमुख, पंढरपूरचे (Pandharpur)  माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली. घोडके यांच्या अकाली निधनाने पंढरपूर शिवसेनेसह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.


 पंढरपूरमधील शिवसेनेच्या स्थापनेपासून संजय घोडके यांचा संघटनात्मक कामात सहभाग आहे. शाखा प्रमुखापासून त्यांचा शिवसेनेतील प्रवास सुरु झाला. पंढरपूर शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदी पदावर त्यांनी निष्ठेने आणि धाडसाने काम केले. पंढरपूर तालुका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात संजय घोडके यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर पंढरपूर नगरपरिषदेत सेनेचे सहा नगरसेवक निवडून आणले. त्यावेळी ते स्वतः उपनगराध्यक्ष झाले. कालांतराने ते काहीकाळ नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होते.


परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष


शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या ब्रीद वाक्यशी सुसंगत घोडके यांचे कार्य होते. राजकारण, समाजकारण, गोरगरीब, निराधार आदींमध्ये मामा म्हणून संजय घोडके हे परिचित होते. धर्मवीर आनंद दिघे कला व क्रीडा मंडळ,  मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना घोडके यांनी केली होती. परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.