Solapur News Update : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे सध्या विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभर फिरत आहेत. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना असेल आणि मुंबई सिनेटसह आगामी काळातील सर्व निवडणुका लढवणार असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंढरपूर येथे एबीपी माझासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबई सिनेटसह आगीमी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे म्हटले आहे.  


अमित ठाकरे यांनी आज सकाळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासोबत बंद खोलीत जवळपास तासभर चर्चा केली. यानंतर त्यांनी विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी चौकात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. "सध्या आपण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी राज्यभर फिरत असून मुंबई सिनेटसह येणाऱ्या सगळ्या निवडणूक लढविणार आहे. राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी सेनेची शाखा असेल आणि कोणत्याही ठिकाणी एखादा प्रश्न निर्माण झाला तर दुसऱ्याच दिवशी तो प्रश्न सोडविला जाईल असे अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 


अमित ठाकरे म्हणाले, "आपण सध्या राज्यभर विद्यार्थ्यांशी संवाद साधत फिरत असताना पश्चिम महाराष्ट्रात एसटी बसेसची मोठी समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असल्याचे जाणवले. ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण सातवीनंतर सुरक्षेच्या कारणामुळे बंद होत असून हे धक्कादायक आहे. आगामी महापालिका आणि इतर निवडणुका जाहीर होताच विद्यार्थी सेनेतील कार्यक्षम उमेदवारांची यादी पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिली जाणार असून यातून साहेब उमेदवार देतील ते उमेदवार निवडणूक लढवतील. आगामी महापालिका आणि इतर सर्व निवडणुकांध्ये सर्व तयारीनिशी उतरणार असून जोरात प्रचारात करणार आहे. सध्या फक्त आम्ही निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची वाट पाहत आहोत.   


दरम्यान, बच्चू कडू आणि अमित ठाकरे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच बच्चू कडू यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट करत दोघांच्या भेटीबाबची माहिती दिली आहे. "विठुरायांच्या पंढरीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे याची भेट झाली. अमितचा स्वभाव अतिशय मोकळा आहे व महाराष्ट्रासाठी काम करण्याची इच्छाशक्ती देखील आहे. शारीरिक व मानसीक दृष्ट्या श्रम करण्याची तयारी आहे. या भेटीत आमची शैक्षणिक विषमतेवर चर्चा झाली. विदर्भात आल्यावर राजकीय विषयावर न भेटता शेती प्रश्नावर आम्ही एकत्र बसणार आहोत, असे बच्चू कडू यांनी त्यांच्या  फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.  



 


महत्वाच्या बातम्या


Amit Thackeray : अमित ठाकरेंचा कोल्हापुरात 'राज'कीय चर्चेला फाटा; म्हणाले, विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याला माझे प्राधान्य