Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते सभा घेताना दिसत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत देखील यावरुन भिगाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, करमाळा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल (Digvijay Bagal) निवडणूक लढवत आहेत. मात्र, तरीही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) अपक्ष उमेदवार संजय शिंदे (Sanjaymama Shinde) यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे. संजयमामा शिंदे यांना करमाळ्यात निवडून द्या असे अजित पवार म्हणाले. लाल लाल सफरचंद, शिमल्याचे सफरचंद असेही अजित पवार म्हणाले. कारण संजयमामा शिंदे यांना सफरचंदाचे चिन्ह मिळाले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी अजित पवार आले होते. यावेळी ते बोलत होते. करमाळा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नारायण पाटील निवडणूक लढवत आहेत. तर महायुकीतडून शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल हे निवडणूक लढवत आहेत. तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे हे सफरचंदाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अशातच अजित पवार यांनी संजयमामा शिंदे यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केल्यानं महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
यशवंत माने यांना पुन्हा निवडून द्या पुढील काळात 4 हजार कोटी देतो
मोहोळ तालुक्याला 3500 कोटी रुपये दिले आहेत. यशवंत माने यांना पुन्हा निवडून द्या पुढील काळात 4 हजार कोटी देतो असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. आचारसंहिता जवळ आल्यावर यशवंत माने मला म्हणायचा दादा निधी द्या. तिकडून राजन पाटील म्हणायचे दादा देता की नाही असेही अजित पवार म्हणाले. त्यामुळे 750 कोटी निधी मंजूर केल्याचे अजित पवार म्हणाले. 2029 ला मतदारसंघ फेरनिवड होणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. मी शब्दाचा पक्का आहे दिलेला शब्द पूर्ण करतो असे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांनी मिमिक्री करत विरोधकांची खिल्ली उडवली. ही योजना टिकणार नाही, यांच्याकडे पैसे नाहीत असे विरोधक म्हणत होते असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर विरोधक कोर्टात गेले आणि आता ते पण पैसे देऊ असे सांगत असल्याचे अजित पवार म्हणाले.
आम्ही महाराष्ट्रात सरकार आणू पण आम्हाला निधी हवाय असं केंद्राला सांगितलं
आम्ही महाराष्ट्रात सरकार आणू पण आम्हाला निधी हवाय असे केंद्र सरकारला सांगितले आहे. बिहार आणि आंध्रप्रदेश प्रमाणे आम्हालाही निधी पाहिज. महाराष्ट्रात आम्ही महायुतीचे सरकार आणू असे अजित पवार म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे असा ठराव आम्ही केला असल्याचे अजित पवार म्हणाले. आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत. विदर्भ, कोकण इथेही मिळत आहेत. फक्त मराठवाड्यात अडचण आली होती कारण तो निजामाच्या राज्यात होता. पण आम्ही त्याबाबत काम करतोय आणि त्याचे रेकॉर्ड तपासत आहे असे अजित पवार म्हणाले. तरीही काहींचे म्हणणे आहे की आम्हाला सरसकट ओबीसीतून आरक्षण पाहिजे. तर ओबीसी म्हणतात आम्हालाच अजून संधी मिळत नाही मराठा समाजाला कशाला त्यात आणता, त्यामुळं त्यावर निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे.