Sushma Andhare Maha Prabodhan Yatra: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजप गेम करणार आहे. 40 पैकी 20 आमदार भाजप फोडणार आहे. यामध्ये पहिला क्रमांक शहाजी बापू असतील आणि दुसरे तानाजी सावंत असतील, असा दावा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्या मोहोळ येथे महाप्रबोधन यात्रामध्ये बोलत होत्या. यावेळी सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. सत्ता हेच महत्वाचं असतं तर उद्धव ठाकरे पुन्हा येईन पुन्हा येईल यासारखा आकांडतांडव केला असता पण तसं नाहीये, असा टोला सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
एकनाथ शिंदे गेल्यानं शिवसेनाला फरक पडत नाही -
जे लोकं म्हणतात शिवसेना संपली, देवेंद्र फडणवीस म्हणाले शिल्लक सेना... पण मागच्या दोन महिन्यापासून यात्रेला अशीच गर्दी आहे. अनेकजण शिवसेनेत आले. अनेक जण गेलेही, पण शिवसेनाला काही फरक पडला नाही. नारायण राणे आले गेले, चुलत भाऊ राज ठाकरे आले आणि गेले काही फरक पडला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले तरी काही फरक पडणार नाही. आमदार कुठेही पळाले असले तरी निष्ठावंत शिवसैनिक हे शिवसेनेसोबत आहेत. त्यांच्या सोबत संवाद साधला पाहिजे, राज्याचे प्रश्न मांडले पाहिजेत, यासाठी ही महाप्रबोधन यात्रा निघाली, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 13 वर्षांपूर्वीचा व्हिडीओ काढून मला बदनाम करण्याचे प्रयत्न केले, असेही यावेळी त्या म्हणाल्या.
तुम्ही माझा अभिमन्यू करु शकत नाहीत, कारण...
यांना वाटलं की टीका केली की सुषमा अंधारे थांबेल, घाबरेल टीका करणार नाही. पण मी घाबरत नाही, मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. कायद्याची मोडतोड होऊ नये म्हणून मी लढतेय. पंकजा ताई बहुजन नेत्या आहेत, त्यांना संपवण्यासाठी बोलले. बहुजन नेत्यांना जरी ते भाजपमध्ये असले तरी त्यांना टार्गेट करण्याचे काम करण्यात आलं.
तावडे, मुंडे, बावनकुळे आदी भाजप नेत्यांना देखील साईड करण्यात आलं. या अनाजीपंतच्या वंशजानी, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिलाय. सावित्रीमाईला त्रास दिलाय तिथं सुषमा अंधारेला त्रास देणे तर फार सोपे आहे. पण मी अभ्यास करून आलेय, मेरिटवर आलेय. तुम्ही अनेकांचे अभिमन्यू केले असतील पण माझा करू शकणार नाहीत, असा टोला सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लगावला.
भाजप नेता राज्यपालांचा राजीनामा मागत नाही -
भाजपच्या नेत्यांनी महापुरुषबद्दल बेताल वक्तव्य केले. त्यावर राजीनामा मागत नाहीत. मात्र काही सेकंदाचा जुना व्हिडीओ काढून आशिष शेलार माझा राजीनामा मागत आहेत. एकही भाजप नेता राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मागत नाही. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांचे आणि राज्यपालांच्या वक्तव्याचे व्हिडीओ लावण्यास सांगितलं. भाजपकडे असलेला आक्रोश दुसरीकडे वळवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
ईडीच्या भीतीने गेले -
ज्या एकनाथ शिंदेने बंड केले, त्यांनी अडीच वर्ष सत्ता भोगली. त्यांना वाटलं असेल हिंदुत्वाबद्दल असं तर मग का ही सत्ता भोगली. ना हे हिंदुत्वसाठी गेले, ना हे कुठल्या कारणासाठी गेले.. हे तर ईडीच्या भीतीने गेले आहेत. 10 वर्षांपूवी आनंद तरे यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदेंना आवरा. शिवसैनिकाला कसं कळतं बघा, असे म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केला. मुख्यमंत्री असताना देखील उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना नगररचना खाते दिले. जे आजपर्यंत कोणत्याच मुख्यमंत्री यांनी दिलेलं नव्हतं.
या सर्वांना वाटलं की भाजपमुळे सत्ता मिळेल, मंत्रिपद मिळेल, ज्यांना काही मिळणार नाही त्यांना खोके तरी मिळतील. या राजकारणात लोकांचे प्रश्न कुठे आहेत?
हे गेले त्यातल्या प्रत्येकाला नोटीस आली होती म्हणून गेले आहेत, असा टोला अंधारेंनी लगावला.