Madha Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच मतदारसंघाच इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. माढा विधानसभा मतदारसंघात (Madha Vidhansabha Election) देखील निवडणूक लढवण्यास अनेकजण इच्छुक आहेत. बरेच जण शरद पवार यांच्या पक्षाकडून तुतारी (Tutari) या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. यासाठी अनेकांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट देखील घेतली आहे. दरम्यान, अशातच आता माढा विधानसभेत नवीन ट्विस्ट आला आहे. आपल्या भांडणाचा लाभ आमदार बबनदादा शिंदे (MLA Babandada Shinde) यांच्या गटाला मिळू नये, म्हणून माढ्यातील जवळपास 8 इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत टेंभुर्णी येथील अति महारुद्र महादेव मंदिरात शपथ घेतली आहे. या सर्वांनी ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलाय.
माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास 55 हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळं आता माढा विधानसभेसाठी माढ्यातून इच्छुकांची गर्दी वाढली आहे. हे सर्व इच्छुक पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटून आपणच कसे योग्य उमेदावार आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, अनेकांनी या जागेवर दावा केल्याने विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांची वाट सुकर होताना दिसत होती. त्यामुळेच आमदार शिंदे यांनी यावेळी आपला मुलगा रणजीत भैय्या शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभे राहणार, महादेवाला साक्षी ठेऊन घेतली शपथ
अशातच आमदार बबनदादा शिंदे यांना घेरण्यासाठी विरोधकांनी डावपेच आखायला सुरुवात झाली आहे. आपल्या भांडणाचा लाभ आमदार शिंदे गटाला मिळू नये म्हणून माढ्यातील जवळपास आठ इच्छुक उमेदवारांनी एकत्र येत टेंभुर्णी येथील अति महारुद्र महादेव मंदिरात शपथ घेतली आहे. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माढ्यातून संजय बाबा कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, काँग्रेसचे दादासाहेब साठे, शरद पवार गटाचे संजय पाटील घाटणेकर ,भारत पाटील , नितीन कापसे आणि हरिदास रणदिवे हे सर्व इच्छुक एकत्र आले आहेत. महादेवाच्या साक्षीने यांच्या चर्चा होऊन यातील ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याच्यामागे इतरांनी एकत्र राहायचे अशी शपथ महादेवाला साक्षी ठेवून घेण्यात आली.
मोहिते पाटील व शिंदे यांच्यातील संघर्ष समोर येणार
एका बाजूला माढा तालुक्यातील ही सर्व मंडळी विधानसभेसाठी इच्छुक असताना इकडे अकलूज येथील मोहिते पाटील यांची सुरुवातीपासूनच माढा विधानसभेवर नजर आहे. माळशिरस विधानसभा 2004 साली राखीव झाल्यानंतर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी सुरुवातीला माढ्यातून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र या ठिकाणी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधानंतर विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपुरात निवडणूक लढवण्यास आले होते. यावेळी भारत भालकेंनी त्यांचा पराभव केला होता, हा इतिहास आहे. मात्र माढ्यातून झालेला विरोध ही सल अजूनही मोहिते पाटील यांच्या डोक्यात असल्याने गेल्या 2019 च्या लोकसभेला शरद पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना डावलून माढा लोकसभेचे तिकीट संजय मामा शिंदे यांना देताच मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश करून संजय मामा शिंदे यांचा पराभव केला होता. मोहिते पाटील व शिंदे यांच्यातील हा संघर्ष याही वेळी समोर येण्याची शक्यता आहे.
माढा विधानसभेवर निवडून जाण्याची मोहिते पाटील यांची सुप्त इच्छा समोर
आजवर बबनदादा शिंदे यांना प्रत्येक निवडणुकीत मोहिते पाटील गटाकडून जोरदार विरोध होत होता. विरोधी उमेदवाराला रसद पुरवण्यात येत होती. मात्र, बबनदादा शिंदे यांनी प्रत्येक वेळी मोहिते पाटील गटाच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली होती. यामुळेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीतून उभा करून शिंदे गटाला दणका देत माढ्यातून 55000 मतांची आघाडी घेतली होती. आता माढा विधानसभेवर निवडून जाण्याची मोहिते पाटील यांची सुप्त इच्छा यावेळी समोर आली आहे. सध्या शिवतेजसिंह मोहिते पाटील हे माढ्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र बलाढ्य शिंदे गटासमोर विधानसभेला तेवढाच स्ट्राँग उमेदवार द्यायची वेळ आल्यास अखेरच्या क्षणी भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना शरद पवार रिंगणात उतरवू शकतात. त्यामुळे माढ्यात उमेदवारीचा वाद वाढल्यास रणजीत भैय्या शिंदे विरुद्ध रणजितसिंह मोहिते-पाटील अशी लढत होण्याची जास्त शक्यता आहे.
शरद पवारांच्या मनात कोण?
माढ्यातील इच्छुकांना उमेदवारी आपणासच मिळेल असा विश्वास असून गेल्यावेळी पराभूत झालेले संजय बाबा कोकाटे किंवा प्रचंड लोक संग्रह असणारे शिवाजीराजे कांबळे ही दोन नावे माढ्यातून समोर येत आहेत. महाविकास आघाडीकडून सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ओबीसी आणि विशेषता धनगर उमेदवार रिंगणात उतरणार असल्यामुळे मराठा समाजाला खुश करण्यासाठी माढा विधानसभेची जागा शरद पवार मराठा उमेदवाराला देतील याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे दांडगा जनसंपर्क असूनही धनगर समाजाचे नेते शिवाजीराजे कांबळे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे. आता शंभू महादेव कोणाचे ऐकणार आणि पवार साहेबांच्या कानात कोणाचे नाव सांगणार हे उमेदवारी जाहीर झाल्यावर समोर येईल.
महत्वाच्या बातम्या: