सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Election) रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील वादात भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या दोघांतील वाद मिटवण्यासाठी आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी खासदार रणजित निबांळकरांना ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. पक्षाने एकदा का उमेदवार दिला तर त्याच्या मागे सर्वांना उभं राहावं लागेल असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. बावनकुळेंचा हा इशारा मोहिते पाटलांना असल्याची चर्चा आहे. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंबीयांची भेट घेतली. यो दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा फायदा विरोधकांना मिळू नये यासाठी बावनकुळेंनी हा दौरा केल्याची चर्चा आहे. 


रणजितसिंह निंबाळकरांना ग्रीन सिग्नल


भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. निंबाळकरांचे कौतुक करताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वात अधिक निधी देऊन निंबाळकरांवर विशेष प्रेम दाखवले. देशातील टॉप 10 मध्ये खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे. मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत. याच्यातील मतभेद दूर होतील. कोणीही बॅनर लावले, काही केले तरी  एकदा पक्षाने उमेदवार दिला त्याच्या मागे सर्वांनी उभे राहावे लागेल.


नांदेड जिल्ह्यातील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत, पण अशोक चव्हाण यांच्या संपर्कात आम्ही नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. 


धैर्यशिल मोहिते पाटलांचा दावा, पण नेते निंबाळकरांच्या पाठिशी


माढा लोकसभा मतदारसंघावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा केल्याने भाजपसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मोहिते पाटील यांची माढा लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद असून मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून भाजपाला जिंकता आला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील आमदार बबनदादा शिंदे, करमाळाचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे शिंदे सेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी आपले वजन विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या पारड्यात टाकल्याचे चित्र आहे.


आपल्या पहिल्याच टर्ममध्ये खासदार रणजित निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील बहुतांश तालुक्यातील पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न मार्गी लावल्याने मतदारसंघात निंबाळकर यांचा मोठा बोलबाला असल्याची चर्चा आहे.